सखोल अंतर्दृष्टीचा कथाकार
'हंस' आणि 'कथादेश' ह्या हिंदीतील अग्रणी साहित्यिक पत्रिका आहेत. उत्तमोत्तम कथांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. 'कथादेश' डिसेंबर २०१० च्या अंकातील कैलाश वानखेडे यांची 'कितने बुश कितने मनु' ही कथा वाचली आणि मी पुरता झपाटलो गेलो. असं काय होतं त्या कथेत झपाटून टाकण्यासारखं? बी.डी.ओ.ऑफिस मध्ये अनुकंपा तत्वावर चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या कमल ह्या दलित तरुणाच्या संघर्षमय जीवनाची ही कथा आहे .अतिशय प्रमाणिकपणे मेहनत करून तो आपली नोकरी इमाने-इतबारे करतो आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचारी असला तरी तो मूलतः हुशार आणि बुद्धिमान असल्याने आपल्या संगणकीय ज्ञानाचा वापर करून बी.डी.ओ.च्या कार्यालयाद्वारा राबवल्या जाणा-या सर्व सरकारी योजनांच्या जुन्या आकडेवारीच संकलन करून तिचं प्रोग्रामिंग करतो. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बी.डी.ओ.हे सगळं काम आपण स्वतः केल्याचं दाखवून मंत्री आणि उच्च पदस्थांची वाहवा मिळवतो.ज्याला श्रेय मिळायला हवे होते त्याला ते मिळत नाही. उलट माझं श्रेय का हिरावून घेतलं ह्याचा जाब विचारला म्हणून बडतर्फीला सामोरं जावं लागतं. अशा कथा तर मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये खूपशा आहेत,मग ह्या कथेचं वेगळंपण ते काय? तर जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मानसिकतेशी भारतीय मनुग्रस्त मानसिकतेचा सांधा जोडणं!
अमेरिका धार्जिणे जागतिकीकरण आणि दलित,आदिवासी, बौद्धांचे प्रश्न घेवून कथा विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न आंबेडकरवादी कथेत अजूनपर्यंत तरी कुणीही केलेला नाही.अंतर्गत सरंजामशाही आणि जातीयावादाला आपला कथा विषय बनवणा-या कुठल्याही भारतीय लेखकाचं ह्या अमेरिकन धार्जिण्या नवसरंजामदारी आणि नववसाहतवादी प्रवृत्तीकडे अजूनही लक्ष गेलेलं नाही.मात्र कैलाश वानखेडे यांनी आपल्या ह्या कथेच्या माध्यमातून अमेरिकन मानसिकता आणि भारतीय मनुग्रस्त मानसिकता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं प्रतिपादन केलेलं आहे. खरंतर एक 'व्यवस्था' म्हणून ह्या जागतिकीकरणाकडे आंबेडकरवादी साहित्यिकांनी विशेषतः कथाकारांनी केलेलं दुर्लक्ष चिंतेचा विषय होता,ती चिंता कैलाश वानखेडे सारख्या कथालेखकांनी काहीशी दूर केलेली आहे.
अमेरिका ज्याप्रमाणे इतर अविकसित आणि विकसनशील देशांना वेळोवेळी त्यांची 'औकात' दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच प्रमाणे दलित,बौद्ध समाज जेंव्हा केंव्हा ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तेंव्हा त्याला इथले मनुचे वारसदार 'धडा' शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. जातीयवाद्यांनी खैरलांजीत केलेले अत्याचार आणि अमेरिकेने इराक मध्ये केलेले अत्याचार यामागचा हेतू एकच आहे आणि तो म्हणजे 'त्यांना धडा शिकवणं'! कथा नायकाला त्याच्या कार्यालयातील सहका-याकडून आणि बी.डी.ओ. कडून जे टोमणे ऐकावे लागतात, जी अपमानस्पद भाषा ऐकावी लागते ती भाषा आणि अमेरिकेची शस्त्रास्रांची भाषा ही एकच म्हणजे 'धडा शिकवण्याची' भाषा होय. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांची अशी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी ह्या कथेत करण्यात आलेली आहे.
सरकारी कार्यालयातील 'प्रशासकीय जातीयवाद' अनावृत्त करणारी ही कथा दलित आंबेडकरी समूहाच्या अनेक समकालीन ज्वलंत प्रश्नांचा उहापोह करते. एक दलित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कमल पासून ते खैरलांजीच्या प्रियंका पर्यंत दमन आणि शोषणाची जी शृंखला दृष्टीस पडते ती दलित उत्थानाच्या गावगप्पा मारणारांना तोंडघशी पाडते. मनु आणि बुश ह्यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा वापरून कैलाश वानखेडे यांनी आंबेडकरवादी जाणिवांचा चपखल विस्तार केलेला आहे.अश्या विषयावरची ही भारतीय भाषांतील कदाचित पहिलीच कथा असेल असा महत्वपूर्ण अभिप्राय प्रसिद्ध हिंदी समीक्षक बजरंग बिहारी तिवारी ह्यांनी प्रस्तुत कथेबद्दल नोंदवलेला आहे त्यावरून कथा विषयाची निवड आणि सादरीकरण याचं महत्व अधोरेखित होतं.
कथादेश मासिकाच्या २००७ च्या अखिल भारतीय कथास्पर्धेत त्यांच्या 'अंतर्देशीय पत्र' ह्या कथेला तृतीय क्रमांकाच पारितोषिक मिळालेले असून ती कथादेश जानेवारी २००८ च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. ही त्यांची पहिलीच कथा! पण नवखेपणाची कुठलीही छाया नसलेली. उण्यापु-या चार वर्षात 'कितने बुश कितने मनु', 'सत्यापित', 'घंटी', 'उसका आना', 'तुम्हारे लोग' आणि 'महू' अशा मोजक्याच कथा लिहिणारे कैलाश वानखेडे हे आंबेडकरवादी हिंदी कथा लेखक म्हणून अल्पावधीतच समीक्षकांच्या चर्चेचा विषय झालेले आहेत.
चांगल्या कथा लेखकाकडे गोष्टीवेल्हाळपणा बरोबरच ज्ञान आणि कल्पनाशक्ती ह्या दोन्ही गोष्टी असणेही अत्यंत आवश्यक आहे. कैलाश वानखेडे आपल्या कथांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा बेमालूमपणे उपयोग करून घेतात. त्यांच्या ह्या सगळ्या कथांची कथानकं ही बहुप्रवाही आहेत. त्यातून त्यांनी सीमांत माणसांच्या जगण्यातील गुंतागुंत,अडसर आणि धडपड चित्रित केलेली आहे. कथेतील पात्र,प्रसंग आणि स्थळांचं अत्यंत तपशीलवार वर्णन ते करतात. मात्र हे वर्णन कुठेही रटाळ होवू न देण्याची खबरदारीही ते आवर्जून घेतात. अगोदर म्हटल्याप्रमाणे गोष्टीवेल्हाळपणा बरोबरच ज्ञान आणि कल्पनाशक्तीचा मेळ घालण्याच्या त्यांच्या कसबामुळे त्यांची कथा ही वाचकाच्या विचारविश्वाला सतत आव्हान देत राहते. आपल्या कथेतला संपूर्ण अवकाश ते चिंतनाने आणि विचारशीलतेने व्यापून राहतात. त्यामुळे 'कितने बुश कितने मनु' मध्ये येणा-या आंतरराष्ट्रीय संदर्भाबरोबरच खैरलांजी हत्याकांडा सारखे देशी संदर्भ किंवा 'महू' सारख्या कथेत येणारा 'तहरीर चौकाचा' संदर्भ वाचकाला माहित असावा लागतो.
कैलाश वानखेडे यांची 'कितने बुश कितने मनु' असो की 'सत्यापित'; 'घंटी' असो की 'तुम्हारे लोग'; 'उसका आना' असो की 'महू' ह्या सगळ्याच कथांमधून मनुने ज्यांना केवळ आणि केवळ "ताडन के अधिकारी" म्हटलेलं आहे त्या दलित शोषित आणि स्त्रीयांसारख्या सीमांत माणसांच्या अंतर्व्यथेची गंभीर आणि वेदनामय अभिव्यक्ती चित्रित केलेली आहे.आपल्या कथांमधून सामान्य माणसांच्या व्यथा-वेदना मांडणे हे एकूणच आंबेडकरवादी कथाकारांची भूमिका असली तरी कैलाश वानखेडे यांच्या कथांमधून येणा-या व्यथा-वेदना ह्या कुठल्याही अभिनिवेषाशिवाय येतात.'कितने बुश कितने मनु', 'सत्यापित' 'तुम्हारे लोग', 'घंटी',इत्यादी कथांच्या माध्यमातून आजच्या दमनकारी शासन व्यवस्थेतील माहोल आणि त्यात आपले हरवलेले वास्तव अस्तित्व शोधणारा 'आम आदमी' ते वाचकाला अवगत करून देतात.
मुळचे महाराष्ट्रीयन असलेले कैलाश वानखेडे हे मध्य प्रदेश प्रशासनाच्या महसूल विभागात उप विभागीय अधिकारी आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील जातीयवाद, गरिबांसाठी असलेल्या विकासाच्या योजना राबवताना प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता, इ. बद्दलच्या त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय त्यांच्या कथांमधून येतो. 'कितने बुश कितने मनु','सत्यापित' 'घंटी' ह्या प्रशासकीय जातीयवादाचे चित्रण करणा-या कथा आहेत. सहस्राकोत्तर कालखंडात जागतिकीकरणानंतर निर्माण झालेल्या नवीन शोषण व्यवस्थेचे समग्र आकलन आणि परिदृश्य त्यांच्या कथांमधून चित्रित झालेलं दिसतं.
'उसका आना' ह्या कथेत वाचकाला तीन स्री पात्रं भेटतात.कचरा वेचणारी घुंघटधारी नवविवाहित दलित स्त्री, कॉलेज मध्ये येवून शिकण्याचं धाडस करणारी बांछडा जमातीची युवती,आणि गर्भश्रीमंत वर्गातील कवयत्री.ह्या तिन्ही स्त्रिया कथेत सक्रीय नाहीत. केवळ त्यांचे उल्लेख मात्र येतात. कविता लिहिल्यामुळे वाचकाला कवयत्रीच उषाकिरण हे नाव तरी अवगत होतं, इतर दोन स्त्री पात्रं तर नाम-रूप विहीन अशीच आहेत. वृत्तपत्रात छापुन आलेली उषा किरण ह्या कवयत्रीची एक कविता कथेतील नायक प्रकाश ह्याच्या वाचनात येते. ती कविता त्याला 'अपना ही बयान' वाटते. केवळ आठ ओळींची ही कविता प्रकाशला आपली वाटते, शक्ती प्रदान करते. त्याच्या जगण्याचा हौसला वाढवते. प्रकाश हा आंबेडकरी विचाराचा युवक ह्या तिन्ही स्त्रियांबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. ह्या तिघींच दुःख, वेदना ह्या आपलेही दुःख, वेदना आहेत असेच त्याला वाटते. प्रकाश हे पात्रं असं 'जेन्डर सेन्सिटिव्ह' म्हणून उभं करण्यातच लेखाकामध्ये खरी बुद्ध आणि आंबेडकरी जाणीव आणि प्रेरणा दडलेली आहे. जातीव्यवस्थे इतकंच पुरुषीव्यवस्थेकडेही गांभीर्यानं पाहणायचा दृष्टीकोन ही कथा अधोरेखित करते.
कैलाश वानखेडे यांची अनुभूती, निरीक्षण शक्ती, विषयाची समज,विषय मांडण्याची हातोटी, तपशील देण्याची आणि तपशिलाचं विश्लेषण करण्याची पद्धती अतिशय अनोखी आहे. त्यांच्या कथेतील भाषा मध्यप्रदेशच्या निमाड प्रांतातील आणि महाराष्ट्राच्या व-हाडी आणि खानदेशी बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली असल्यामुळे अत्यंत वैविध्यपूर्ण, रसाळ, मधाळ,जिवंत वाटते. भाषेवर आणि तिच्या लकबीवर लेखकाची स्पष्ट हुकुमत जाणवते.सर्वच भारतीय भाषेतील आंबेडकरवादी कथेला भूषण ठरावी अशी अशेष सर्जनात्मक भाषा शैली ते कथेसाठी वापरतात. त्यांची कथा वाचताना गद्य-काव्य वाचत असल्याचा प्रत्यय येतो. काव्यमय शैलीत कथेची रचना करण्याचा त्यांचा हातखंडा अवर्णनीय आहे.प्रत्येक कथेची शैली, मांडणी वेग वेगळी आहे.अनुकरण कुणाचे का असेना स्वतःचे जरी असले तरी,अनुकरण हे अनुकरणच असते.कैलाश वानखेडे यांच्या कथेत त्यांनी इतरांचंच काय पण त्यांच्या स्वतःच्या शैलीचंही अनुकरण टाळलेलं आहे. त्यांच्या ह्या सर्व कथा एकत्र जरी वाचल्या तरी त्या एकाच कथा लेखकाच्या आहेत असं वाटत नाही.
'विस्डम' ही आंबेडकरवादी साहित्याची पूर्वअट आहे. विस्डमचा शब्दाकोषीय अर्थ अनुभवयुक्त ज्ञान, विवेक, बुद्धिमत्ता, दूरदर्शित्व असं आहे. बुद्ध तत्वज्ञानानुसार करुणा भाव आणि प्रज्ञाजाणीव ह्या दोन्ही भावजाणिवा ज्या अनुभूतीत एकवटल्या आहेत त्या भाव- जाणीवेला 'विस्डम' म्हटले जाते. मराठीतील आंबेडकरवादी कथाकार योगीराज वाघमारे, गौतमीपुत्र कांबळे आणि दीपध्वज कोसोदे यांच्या प्रमाणे कैलाश वानखेड यांच्या कथा वाचताना ह्या 'विस्डम'चा प्रत्यय येतो.
'कितने बुश कितने मनु' ही कथा वाचण्यात आल्यामुळे आणि तिच्या मराठी अनुवादानिमित्ताने परिचित झालेला हा कथा लेखक त्याच्या कथांमधून जेवढा संवेदनशील आहे, प्रत्यक्षातही तो तेवढाच संवेदनशील आहे. 'कितने बुश कितने मनु' आणि 'सत्यापित' ह्या दोन कथांचा मी मराठी अनुवाद केलेला आहे.

No comments:
Post a Comment