अटेस्टेड (''सत्यापित ''का मराठी अनुवाद )

मी वाट पाहत होतो की माझा नंबर येईल अन माझं अटेस्टेशनचं काम होईल.
मला अटेस्टेड करायचा आहे माझा फोटो.मी आज काहीशा चिंतेत असल्याचं अन मी आता जास्त वेळ वाट पाहू शकणार नसल्याचं माझ्या चेह-याकडे पाहून कुणीही अंदाज करू शकतो. माझ्याकडे धिर होता, वेळ होता,स्वप्नं होती, माझ्या जवळ मी होतो, आणि आता माझ्याकडे अर्जावर चिटकवलेला तो फोटो आहे, ज्याला सुख-दुःखाची अनुभूती नसते. फोटोवर बसलेला शिक्का अन केलेली सही प्रमाणित करणार होती माझा वजूद. फोटो अटेस्टेड करणारा तो शिक्का खरं तर चेहरा खराब करतो आणि लप्फेदार सही उरली-सुरली कसर भरून काढते. फोटोतला चेहरा ओळखणं मुश्कील होऊन जातं अन त्यालाच प्रमाणित मानलं जातं. मी येरझारा घालू इच्छित नव्हतो.उभं राहू इच्छित होतो. मी खूप थकलो होतो. तहान-भुकेन माझ्या पोटात कावळे ओरडत होते अन डोक्यात राग खदखदत होता. तापलेलं लोखंड जो पर्यंत आगीत असतं तो पर्यंत लाल दिसत,आगीतून बाहेर काढलं म्हणजे काळं दिसायला लागतं. ज्यानं लोखंडाला असं तापलेलं बघितलं नाही,त्याला काय कल्पना की आपल्या मूळ रंगात आलेला हा लोखंडाचा तुकडा किती गरम असतो ते!

माझ्या अश्या तापलेल्या आशा-आकांक्षा घेऊन मी माझ्या नंबरची वाट पाहतो आहे. जिथं मी ऊभा आहे, तिथच व्हरांड्यात येणा-या जाणा-या लोकांमधून एका चेह-यावर वारंवार माझी नजर पडते. आपल्या अस्तित्वापासून कोसो दूर. तो दुविधावस्थेत आहे. जाऊ की नको. तो घाबरलेला आणि संकोचलेला आहे. आपल्या हातातले चुरगळलेले कागद तो खालून वरून न्याहाळतो आहे. काही तरी शोधतो आहे. कुठली तरी अनामिक भीती त्याला स्वस्थ बसू देत नाही. हा इथं ह्या व्हरांड्यात असं का भटकतो आहे? काय काम असेल याचं? मी विचार करत बघत राहिलो. खरे तर इच्छा नसतानाही मी ऊभा आहे. मला वाटतं की दोन शब्द बोलावे त्याच्याशी. बराच वेळ झालाय तोंडात जिभेवर शब्द रेंगाळले नाहीत. तो ही माझ्याकडे सारखं बघतो आहे पण भावनाहीन! ओळखू पाहत होता. आता मी त्याला कसं सांगू की अरे बाबा मी तुझ्या ओळखीचा नाही म्हणून. त्याच्या चेह-यावर कुठलेच भाव नसतानाही त्याचेकडे बघून मी हलकेच हसलो. मलाही आता असं वाटू लागलं की त्याने माझ्याशी बोलावं. मी त्याच्याशी संवाद करू इच्छित होतो. आणि संवाद, हसून केला की मनावरचा ताण हलका होतो. थोडं बरं वाटतं. घड्याळाचं काय त्याच्या काट्यांना टक-टक करत चालत राहायची सवय असते म्हणून ते चालतच राहतात. पण इथ मनात धक-धक करणारी हृदयाची धडकन ती एका लयीत थोडीच चालते. माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागले की ह्या माणसाने काही उत्तर दिले नाही तर? कोडं अपमानजनक वाटायला लागलं आणि ह्या अपराधीपणामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती अधिकच वाढवली. काय विचित्र माणूस आहे. कुठे हरवला आहे की काही चैतन्यच नाही त्याच्या अंगात की कमीत कमी माझ्या हसण्याला प्रतिसाद तर द्यावा. आता जर बोलायची आणि सांगायची किंवा ऐकायची काही इच्छा नसेल तर नको बोलू,नको ऐकू. जबरदस्ती तर करू शकत नाही. पण थोडं हसायला काय जातं? एका तापलेल्या लोखंडावर हसण्याचे काही थोडे थेंब टाकायला काय जातं?
हा गडी 'न ' चं ओझं घेऊन आलेला आहे. एवढं की तो कमरेतून पार मोडून पडलेला आहे.मान खिळखिळी झाली आहे. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं एवढी मोठी झालीय की तो त्याच्या वयापेक्षा मोठा दिसतो. हा गडी नाही म्हटलं तरी तीसच्या आतच असावा पण तसं वाटत नाही. माझी जिज्ञासा जमिनीवर पडलेल्या माश्यासारखी तडफडत होती. आणि ह्या बहादराने आणखी दोन मिनिटं जर मला हसून किंवा बोलून प्रतिसाद दिला नाही तर ती जिज्ञासा मरून जाईल.आणि त्या शोकाकुल वातावरणात मझा वेळ एक पार्थिव म्हणून शिल्लक राहील. मला भीती वाटायला लागली. असं कसं होऊ शकतं की तुम्ही स्मित देणार आणि त्याला कुणी प्रतिसाद न द्यावा?
आतापर्यंत मी हार, अपमान ह्या सारख्या शब्दांना बाजूला सारलं आणि हा माणूस बदमाश टाईपचा नसल्याचं माझ्या लक्षात आलं. तो माझ्यापेक्षा जास्त चिंतीत आहे आणि जास्त चिंता ह्या गोष्टीची वाटत होती की एक अनोळखी इसम विनाकारणच आपल्याकडे बघून हसणार नाही, खर तर तो जाणून असेल की अनोळखी हास्याला स्वार्थाचा मुलामा असतो. तर ह्या गोष्टीनेच कदाचित त्याला विचलित केलं आणि तो ऑफिसच्या एका बोळात शिरला.
तहान रोखून धरू शकतो पण कम्बख्त लघवी नाही रोखता येत. रोखायलाही नको आणि मी हसण्याची बाब मनाशी ठेऊन मुतारी शोधायला बाहेर पडलो. त्याच्या मागे चालत चालत मी ठरवलं की मुतारीत पन्टची चैन उघडल्यानंतर तिथेच सोडून यायची हसण्याची उम्मीद, जिथे लोक पानाच्या पिचका-या, बेडके थुंकून येतात. ज्याच्या जवळ जे असतं ते तो तिथं सोडून येतो. मुतारीतून बाहेर पडणारी माणस आपल्या मागे ती घृणा, नीचता,दुष्टता सोडून येतात,जी आपल्याकडे असते. तिथल्या भिंतींवर तेच लिहीलं जात जे त्यांच्या अचेतन मनात असतं. जे त्यांच्या आवाक्या बाहेर असतं, जो त्यांच्या कुंठावस्थेचा झेंडा असतो. त्यांची गोष्ट राहू द्या, मी तर मुतारीच्या शोधात आहे आणि तो गडी मला आपल्या मागे मागे येताना पाहून घाबरलेला. त्याला वाटलं मी त्याचा पाठलागच करतोय.
शेवट पर्यंत मुतारी सापडली नाही. ऑफिसच्या बाहेर जाणा-या गल्लीत, जिथं घाण होती, दुर्गंधी होती,तिथंच उभ्यानं मोकळं झालो. तो तिथं नव्हता. म्हणून मी ही माझं हास्य माझ्याकडेच ठेवलं आणि हसलो, लघवी करत करत.
जेव्हा मी त्याच जागेवर परत आलो जिथं मी काही वेळापूर्वी उभा होतो, तोपर्यंत माझ्या चेह-यावर हास्य कायम होतं. आणि तो सुद्धा तिथंच उभा दिसला जिथं अगोदर होता.आम्ही दोघंही दोन वेगवेगळे दरवाजे असलेल्या जमिनीवर उभे होतो, जमिनीवरची लोकं. आत खुर्च्यांवर होते खुर्च्यावरची लोकं. आतून हसू खळखळून फुटून बाहेर येवू पाहत होतं. खळखळणारं हास्य एवढं बर वाटायला लागलं की माझ्या चेह-यावर स्मित तरळलं. तापलेल्या में महिन्यात घनघोर पाऊस आल्याचा भास झाला. आणि तो मला बघून चकित! चिंतेच्या जाळ्यात तडफडणा-या माणसाला रील्याक्स होऊन हसताना पाहून हैराणी/ बेचैनी तर होतेच. असल्या हैराण/बेचैन नजरेनंच क्लार्कनं मला पाहिलं आणि तो ही परेशान/बेचैन झाला. आता माझ्या समोर दोन परेशान/बेचैन माणसं उभी ठाकली. क्लार्कच्या परेशानीच एक वेगळच कारण आहे. दोन तासापूर्वी मी त्याला सांगितलं होतं की मी घाईत आहे अटेस्टेशनसाठी मला अगोदर जाऊ दे. आणि आता त्याने माझ्या चेह-यावरचं स्मित, बेफिकिरी पाहिली तर तो परेशान झाला. बेफिकीर व्यक्ती बरी दिसत नाही, हे मला समजलं. मी बेफिकीर नव्हतो पण तसा दिसत होतो. मी कसंही करून लवकरात लवकर तिथून निसटायच्या प्रयत्नात होतो. पण निसटू शकत नव्हतो. तेंव्हा विचार करायचं सोडून मी त्या नवजवान गड्याबरोबर बोलण्यासाठी पुढे सरसावलो तर मला पाहून तो मरतुकडा मागे सरकला. मी थांबलो. ह्याच गल्लीत एक तरुणी ही फिरत होती. ती ना रागात होती ना परेशानीत. तिच्या चेह-याकडे बघून वाटत होतं की तिनं आपल्या सगळ्या भावना झाकून ठेवलेल्या/ लपवलेल्या आहेत. किती कसलेली अभिनेत्री होऊ शकते ती,जर तिने एखाद्या नाटकात काम केलं तर? मला माहिती आहे की ह्या गल्लीत तेच लोकं येरझारा मारताहेत, ज्यांचं काही काम आहे, पण ते होत नाही,किंवा ज्यांचं काम कुणीही करत नाही, त्यांना वाटत की आपलं काम लवकर व्हावं आणि पडावं ह्या गल्लीच्या बाहेर. कुणी आपली व्यथा घेऊन उगीच नाही भटकत? कुटल्या ना कुठल्या गोष्टीची परेशानी तर असणारच ना. तर मग ही मुलगी परेशान का दिसत नाही? का नाहीत तिच्या चेह-यावर परेशानीच्या तारुण्य पिटिका? मेकअप करून तर आली नाही, की तिला माहिती असेल परेशान दिसणाराला अधिक परेशान केलं जातं म्हणून! अडलेल्या माणसाच्या अडलेपणाचा फायदा उठवायला टपुनच असतात लोकं. माझा हसमुख चेहरा जेव्हा क्लार्कने पाहिला होता तेव्हा तो परेशान झालेला होता, दुस-याचं सुख पाहवत नाही. तरुणीचा बेफिकीर चेहरा बघून मी ही नाही का परेशान झालो ? की मी त्या क्लार्कचा मुखवटा चढवला?
पिवळ्या रंगाचा सलवार सूट एकदम टाइट. सगळं शरीर कसं कपड्यांनी घट्ट कसलेलं. तिचे पाय, कंबर सडपातळ दिसले. केस सुद्धा घट्ट बांधलेले. अठरा-वीस वर्षाची असेल. त्या मुलीच्या हातावर घड्याळ आहे एकदम लहान आणि दुस-या हातात पिवळ्या रंगाच्या दोन बांगड्या. ती ह्या गल्लीत एका सुगंधासारखी पसरली. ह्याच गल्लीत परेशनी, पिडा, तणाव व व्यथांचे धुलीकण उडत होते आणि चेह-यांवर बसून डोक्यातील यंत्रात बिघाड निर्माण करत होते. किती महत्वपूर्ण कण होते ते? मुलीच्या येण्याने किती लवकर ते कण चेह-या वरून, डोक्यातून दूर गेलेत. एक चैतन्य होऊन आली होती ती मुलगी जिच्यामुळे बरबाद टाईम आबाद झाला.
एक हास्याची लकेर त्या मुलीकडे देण्या अगोदर तिच्या डोळ्यात पहावं असं वाटलं. म्हणजे स्वतःला तोलून बघावसं वाटलं किती रिस्पांस देईल ते. नाहीतर ही हास्याची दुसरी लकेर ही वाया जावी आणि क्लार्कच्या चेह-यावर दिसावी. काही झालं तरी मी माझं हास्य क्लार्कला देवू इच्छित नाही. ह्यानेच हो ह्यानेच मला मागील दोन तासांपासून लटकवत ठेवलं. तो क्लार्क असल्याचं त्याच्या कपड्यावरून वाटत नाही. तो रूम मध्ये बसलेला. त्यामुळे त्याच्या पदाची ओळख पटली. मी त्याला टाळून आत जायला लागलो, तर त्याने अतिशय ढिम्म चेह-याने आणि कठोर आवाजात ज्यात धुत्कार समाविष्ट होता, म्हणाला- "काय काम आहे?"
"साहेब फोटो अटेस्टेड करायचा आहे." माझ्या आवाजात थोडी मग्रुरी होती. विनय-विनंती नव्ह्ती. अर्जावर लिहिलेलं होतं की केवळ राजपत्रित अधिका-याकडूनच फोटो अटेस्टेड करून लावा, म्हणून राजपत्रित अधिका-याच्या शोधात आलो होतो.
"आता वेळ नाही साहेबांकडे, दुस-या साहेबांकडून करून घे." क्लार्कचा हा आदेश होता आणि मी दुस-या साहेबांना भेटून आलेलो होतो.त्यांनी माझी सगळी कागदपत्र पाहिलीत. आय कार्ड पाहिलं. मग कुठे राहतो ते विचारलं. मी सांगितलं 'आंबेडकर नगर'. तर ते म्हणाले माझ्याकडे आता वेळ नाही. एवढं सारं पाहून-देखून झाल्यावर शेवटी फोटोवर सही करायला केवळ दोन सेकंद लागतात, दोन सेकंद . परंतु साहेबांजवळ नव्हता वेळ फक्त दोन सेकदांचा. म्हणून मला वाटलं क्लार्क जे म्हणतो आहे ते खरं असावं. म्हणून बघितली वाट.
"मी थांबतो थोडा वेळ." माझ्या आवाजात आता नम्रता उतरली होती.
"अर्जंट आहे?" क्लार्कच्याही आवाजात अचानक मृदुलता आली होती. मदत करता चेहरा दिसायला लागला. चला काम होईल असं समजून मी बोललो-"खूपच अर्जंट आहे, जर आज झालं नाही तर हा अर्ज पाठवू शकणार नाही." माझ्या मध्ये आता अजीजी उतरली होती जी मेंदूला सांगत होती की मी हात जोडले नाहीत म्हणून. जोड, हात ही जोड. आतून कुठून तरी आवाज येत होता. पण हात जोडू शकलो नाही. सगळा अर्ज वाचून झाल्यावर तो बोलला-"काही आणलं आहे काय?" क्लार्कच्या आवाजात दबकेपणा होता आणि डोळ्यात उत्सुकता. तो खुर्चीवरून उठला.
"म्हणजे?"
" म्हणजे लवकर काम करायचं आहे,आणि असेच काही सगळ्यांचे फोटो अटेस्टेड करत नाहीत साहेब. मी सांगेन साहेबांना की माझ्या गल्लीत आहे तुझं घर म्हणून. मी तुला ओळखतो असं सांगितल्यावर करतील साहेब साईन." लालूच होती, खोटेपणा होता, मुखवटा होता, विश्वासघात होता. काय - काय नव्हतं त्याच्या ह्या शब्दांमध्ये. मी सुन्न झालो. हैराण झालो. उंच इमारतीवरून खाली पडल्यानंतर माझ्याकडे विचार करण्यासारखं काहीच नव्हतं. जी आशा जिवंत झाली होती ती आता मरून पडली. मी काय बोलणार. आता माझ्याकडे हात होते जोडण्यासाठी पण तोंडात शब्द नव्हते. तोच खोलीच्या आतून बेल वाजली. माझ्या सर्व विचारांमध्ये-भावनांमध्ये खंड पडला. कधी मी बेलकडे तर कधी क्लार्क कडे पाहत होतो,आणि तो आपल्या प्रस्तावाच्या उत्तरार्थ माझ्याकडे! मी आता त्याच्याकडे बघू इच्छित नव्हतो.
मी माझी नजर वळवली आणि थोडं पुढे सरसावलो खोलीत आत जाण्यासाठी.
"सांगितलं ना एकदा. लक्षात येत नाही? आता वेळ नाही साहेबांकडे." चरफडत, ओरडत मला मज्जाव करत तो आत गेला. मी हतबल झालो. खोलीतून आवाज आला.
"मोठा धीट झाला पांडे तू आता? काय करतो तू दिवसभर?"
साहेबांनी आत चांगली खरडपट्टी काढल्यानंतर कुठलाही आवाज आला नाही. शांतता पसरली होती,जी माझ्या चेह-यावर हास्य देवून निघून गेली.
" त्या शर्मा बाबुला बघ. साला कामधाम काही करत नाही. त्याचा परिणाम तुझ्यावर झाला की तुझा त्याच्यावर? ...............जा..........समजत नाही, शर्माला बघ जा."
तो अपमानित चेहरा घेऊन बाहेर आला आणि माझ्याकडे डोळे वटारून म्हणाला- "दहा वेळा समजावून सांगावं लागेल? टाईम नाही साहेबांकडे; चल जा" ज्या पद्धतीने त्याला आत ऐकावं लागलं होतं त्याच पद्धतीनं तो बोलला. त्यानं एका दगडात दोन पक्षी मारले होते. एक मी आणि दुसरा साहेब. अप्रत्यक्ष उत्तर दिलं होतं त्यानं आतमधल्या साहेबाला.
त्याच उत्तरावर स्वार होऊन तो निघून गेला साहेबांचा वेळ माझ्या तोंडावर मारून. माझ्या डोक्यात अपमान बिपमानाच भूत घुसलं पण मी ते माझ्या चेह-यावर दिसू दिलं नाही. कुठल्याही परिस्थितीत मला माझं काम आजच करायचं आहे हा विचार करूनच मी माझं लक्ष दुसरीकडे वळवलं. क्लार्कला बघत मी व्हरांड्यात येणा-या जाणा-या लोकांचे चेहरे आणि त्यांचं चालणं न्याहाळू लागलो. प्रत्येकाचा चेहरा आणि चाल बघून त्यांच्या येण्याचं प्रयोजन कल्पनेनं वाचण्याचा प्रयत्न करू लागलो.माझ्या कडे वेळ नाही. माझा वेळ वाया जात होता मला बर्बाद केलं जातंय असंच मला वाटू लागलं. प्रत्येक छोट्या मोठ्या नोकरीसाठी अर्ज करताना आपला एक फोटो चिटकवावा आणि मग अटेस्टेड करण्यासाठी चकरा मारून पैसा आणि वेळ वाया घालवावा. प्रत्येक वेळी यातनांच्या अश्या जीवघेण्या अनुभवातून जातोय मी. डोक्यात- मनात कुठंतरी काहीतरी बोचतं. सलतं. ह्या वेळी सुद्धा हाच प्रश्न उपस्थित केला ब-याच राजपत्रित अधिका-यांनी की आम्ही नाही ओळखत तुला. कडाक्याच्या में महिन्यात जळते प्रश्न घेऊन हे माहित असूनही की शाळा आणि कॉलेज बंद आहेत तरीही कुणी सर चुकून माकून भेटणार असं समजून गेलो परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्यानी दरवाजे बंद केलेले होते. बंद दरवाजे बघून माघारी फिरलेलो होतो आणि ह्या व्हरांड्यात उभा होतो. शेवटची आशा घेऊन. ह्या व्हरांड्यातला प्रत्येक जण आपलं म्हणणं साहेबांनाच सांगू इच्छित होता. आपापसात एकमेकांशी कुणीच काही बोलताना दिसलं नाही. जे होते ते विखुरलेले. काम झालं की माणसं लवकर पळत होती किंवा आश्वासन मिळालं तर आशेने पावलं उचलत होती. अशा पावलांपेक्षा ते जास्त आहेत जे प्रतीक्षा करताहेत. अशा प्रतीक्षा करणारांनी हातात हात घालून साखळी बनवली तर? तर................आणि माझा चेहरा अधिकच खुलला.
चला बोलून तर बघू, काय करेल तो मरतुकडा? उत्तर नाही देणार? नको का देईना, प्रयत्न करून पाहू या. अंगातून घाम निघाला की बरं वाटतं जरा, बोलून मोकळं झाल्यासारखं, ओझं घेऊन चालता चालता, एक वेळ अशी येते की मन झंकारून उठते चालण्यामुळे. बोलण्याचा विचार पक्का केला. ती मुलगी येरझारा घालत होती. थांबत नव्हती. मी थांबलेलो.वाटलं मला थांबवते ती. मी तिला तोलुन मापून बघण्यात असमर्थ झालो. क्लार्क जाऊन परत आला. तो स्थानापन्न होताच ती मुलगी त्याच्या जवळ आली. आपल्या हातातील कागद तिने क्लार्क जवळ दिले. क्लार्क त्या कागदांवरून नजर फिरवत हसत हसत म्हणाला- "अरे तू तर लल्लनची मुलगी आहे! खूप चांगला माणूस होता लल्लन. दोस्त होता माझा तो दोस्त. बरीच मोठी झालीस तू? तुला कडेवर घेऊन फिरायचो आम्ही. बरीच मोठ्ठी झालीस, खूप मोठी" त्यानं त्या मुलीचे डोळे, नाक, ओठांकडे पाहत पाहत आपली नजर तिच्या छातीवर रोखली आणि त्या रोखलेल्या नजरेनेच तो बोलत राहीला. नजर अधिक रोखत राहीला. आरपार. लाळ घोटत होता. जसं खड्डा करण्यासाठी पाणी ओताव, लवकर खोदण्यासाठी, त्याच पद्धतीनं लाळ घोटत होता.
मुलगी जरा मागे सरकली. क्लार्कच्या हातातून आपले कागद घेतले. "काका तुम्हाला बघून मलाही माझ्या पप्पाची आठवण झाली. तुम्ही माझ्या पप्पा सारखेच आहात."
खड्डा खोदताना एखादा दगड लागावा आणि हाताला झटका बसावा तसा त्याला झटका बसला आणि ती मुलगी साहेबाच्या खोलीत शिरली. तिला अडवण्यासाठी क्लार्क जवळ शब्द नव्हते. हात सुद्धा नव्हते.
मुलगी आत मध्ये गेल्यानंतर माझ्या पावलांनाही गती आली आणि मी त्या मरतुकड्या माणसाच्या समोर गेलो, स्मित मागे सोडून सरळ शब्द पुढे केले.
"काय काम होतं इथं?"माझा प्रश्न ऐकून आणि मी त्याच्या अधिकच जवळ गेल्यामुळे त्याने आपल्या चिंतेबरोबरच अविश्वासाची चादर ओढण्याचा प्रयत्न केला व थोडं झिझकत तो म्हणाला-"जरा काम होतं"
मला वाटलं माझ्या आत असलेला रिक्तपणा थोडा भरून निघावा आणि आपलं काय काम आहे ते सांगावं. दोघांचं मन हलकं करण्यासाठी मी म्हटलं- "मी इथं फोटो अटेस्टेड करायला आलेलो आहे. तीन तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे.उभं राहून राहून कंटाळा आला काय करावं तेच समजत नाही."मी प्रश्न केलेला नव्हता त्यामुळे उत्तर येण्याचा प्रश्नच नव्हता.परंतु मला त्याचं म्हणणं ऐकायचं होतं.
थकलेल्या आवाजात त्यानं प्रश्नाचं उत्तर न देता म्हटलं- "पान्हेरा गावात कशाचीच सोय नाही.घरवालीले दिवस गेले होते. सरकारी दवाखान्यात आल्तो तिले भर्ती क-याले. नरसनं पाह्यलं नं म्हणली दोन दिवसान ये. घरी जायाच-यायचं किराया भाडं कोण दियीन? मजुरी भेटत नही वावरत, म्हणून ड्रायव्हरकी सिकलो. मी गाळी चालोतो. जीप. चापोरा ते आन्तुर्ली. आता इकळे आलो त गाळी बंद. गाळी चालोली नही त खायाच काय न ठेयाच काय? नरसाले म्हतल की भरती करून घे मह्या बायकोले. पळून राहीन एका कोप-यात कुठीबी. नही आईक्ल तिनं. मना केलं त केलं बुवा तिनं. डाक्तरले भेटू म्हतल त डाक्तर साहेब बी नही भेटले. त मग कुठी जाऊ. इक्ळेच ठेसनावर थांबलो मंग आमी. तठीच खानं नं तठीच जपनं सामोसा नं फुटाने खावून कहाळले दोन दिवस. ते ठेसन आहे नं रेलवाईच तठीच अंध्या भिकारी पागल लोकाय्बरोबर पळल्लो. दुसरी कळे कुठी जागा नही भेटली की तठी थामता इन,जप्ता इन, हाग्यामुत्याची सोय हुईन........बिनघोर राहता इन..........तठीच ठेसनात दुस-या दिशी घरवालीच्या पोटात दुख्याले लागलं त तिले पाईच घिऊन निघलो.रस्त्यात चालता चालता लळत-बोम्ब्ल्तच होती. आता मी काय करू! कुठ्लीबी गाळी थांब्याले नं बसोयाले तयार नी........तिचं लळंनं-बोम्बालन पाहून माही माय बी लागली लळ्या-बोम्ब्ल्याले...... कोणी नी आइकत होतं आमचं........ मही त बोलतीच बंद झाली. काय करू...... हिले धरू ......उठूऊ बी शकत नव्हतो. ...... तसंच ओढत ताणत घिऊन आलो आन दवाखान्याच्या गेटपाशी म्हणली आता नी सहन व्हत....... आन तठीच बसली....... लेटूनच गेलीन जमीनवर.......आन थोळ्या टायमानतं ती बायातीनच झाली........मी पयतच सुटलो.......दवाखान्यात ........ कोण्हीच येयाले तयार नी झालं. दोन तीन घंट्यायन लोकायन फोटू कहाळले.......वीच्या-याले लागले......पन तिले दवाखान्याच्या आत नेयाले कोणीच तयार व्ह्य्ना.....मंग हातपाय जोळून दवाखान्याच्या वरांड्यात लेटोली........ दवाखान्यात जागा नी म्हणत........ मंग एक माणूस म्हनला की आम्हाले बदनाम क-याकरता गेटावर डीलेव्री केली म्हणून. दोन मिंट नी थांबू शकली...... कसं सांगू त्याहिले की दोन दिवसापासून थांबेल आहे म्हणून......." तो बोलता बोलता थांबला. मी ही त्याच्याबरोबर थांबलो. तो तिथंच हॉस्पिटल मध्ये थांबला. थोड्या वेळाने मी म्हटले- "मग....." तो म्हणाला,"मंग मी पोरगी न तिले दवाखान्यातच सोळून घरी आलो. मायले सोबत घेतलं. मी गाळी चालोयाले निघून गेलो. दूरची सवारी होती. एद्लाबाद्ची. तठी गेलो, तं पकळंली गाळी. म्हणले जा दंड भर. आता दंड भ-याले कुठी व्हते पैसे मह्या जोळ. माल्कले फोन केला तं म्हनला तु कशाले तळफळला महाराष्ट्रात गाळी घिऊन. एम पी ची गाळी जाते का तिकळे? आता त्यानं चार बाता सुनोल्या आन पटकला फोन. मी बी दोन दिवस तठीच पळून राहलो. मंग गाळी सोळून इकळे आलो. इकळे इवून पाहतो त बायकोची सुट्टी करेल व्हती हास्पिटलवाल्यायन."
मला त्याच्या बोलण्याचा आगा-पीछा कळत नव्हता आणि तो बोलायचं थांबत नव्हता. एकसारखा बोलत होता. माझा चेहरा पडला. पुनः गाडी रुळावर आणण्यासाठी मी म्हटले,"गाडी सोडवायला आला काय?"
"आठी कुठी सुटीन गाळी? महाराष्ट्राचा मामला आहे. मी त दवाखान्याचे चक्कर लावून लावून परेशान व्हयेल आहे."
"तर मग कशाला जातोस दवाखान्यात?"
"ते पैसे भेटतातना दवाखान्यात डीलेव्रीचे? ते नही भेटले आजून. पैसे भेटो ना भेटो पन बात त जरा चांगली केली पाह्यजे. ते त मले पाहताच काट्याले धावते." त्याचा अनेकदा चावा घेऊन त्याला घायाळ केल्याचा मला भास झाला. जखम दुखरी झाली. मी समजू शकत नव्हतो की हा माणूस इथं कशासाठी आला? काय तक्रार आहे याची? तक्रार करायची तर सगळ्याच गोष्टींची करावी लागेल. परंतु करू इच्छित नाही. काय हवं आहे त्याला? विचार करतच मी त्याला प्रश्न केला,"नाव काय गड्या तुझं?"
"भाऊसाहेब इंगळे."
"तु इथं कश्यासाठी आला आहे? नाही म्हणजे काय काम आहे तुझं?"
"कम्प्लेट क-याले."
"........कुणाची?"
आमच्या बोलण्यानं क्लार्क वैतागला. मी माझा टाईम पास करत होतो. माझं काम होओं न होओं,परंतु क्लार्कच्या अशिष्टतेचा बदला घेण्याच्या इच्छेने माझ्या चेह-यावर हास्य फुललं. क्लार्कची परेशानी त्याचा चेहरा जसजशी बेरंग करत होती, तसतसा माझ्या चेह-याचा रंग उजळत होता. खेळाने चरम सीमा गाठली होती. उपेक्षा आणि उपहासामुळे क्लार्क परेशान होत होता. मला ह्या माणसाचं म्हणन ऐकण्यासाठी धैर्य एकवटायचं होतं. "कुणाची तक्रार करणार?" त्यानं ऐकलं नाही. तो आपल्या घरच्या विचारात हरवला असावा. आपल्या नवजात मुलीचं हास्य आणि सद्य प्रसूत पत्नीच्या यातानाच्या दोरीवर डोंबा-यासारखा उभा. इथच व्हरांड्यात माझ्या समोर तो आपलं शरीर ठेऊन गेल्यासारखा. मी विचार करतो की त्याच्या त्या नवजात मुलीला काय हे ओळखण्याची क्षमता प्राप्त झाली असेल की त्याला तिचा बाप म्हणून प्रमाणित करावं. हा मरतुकडा त्या मुलीच्या हस्यासाठीच उभा असेल. काय ह्याला एवढंही माहिती नसेल की नवजात शिशु हलकसं स्मित देतं, न ओळखताही. भाऊ साहेब न ओळखताही की तुम्हीच आहात त्याचे बाप, ते प्रमाणित करून टाकते तुम्हाला! जर ते हसलं तुमच्याकडे बघून तर समजू नका की ते एका मुलीचं आपल्या पित्यासाठीचं हास्य आहे म्हणून! ते एका जीवाचं दुस-या जीवासाठीचं हास्य असतं. चार वर्णांच्या हजार धाग्यांच्या गुंत्यात गुंतलेल्या धर्मशास्त्रांच्या ठेकेदारांनो, हा माणूस माझ्या कडे बघून क हसत नाही?
जेंव्हा त्यानं डोक्यावरची टोपी काढून डोक्याचा घाम पुसला,तर डोक्यावर उगवलेल्या छोट्या छोट्या केसांमध्ये अतिशय लहान असे थेंब चमकत होते. आपलं अस्तित्व अबधित राहावं त्यासाठी. आम्ही लोकं घरातला कुणी मेला तर केस कापत नाहीत. हे लोकं सुद्धा केस कापत नसावेत तर मरण्याचा प्रश्न फिजूल आहे आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन मी त्याला व्हरांड्यात घेऊन आलो व अनुत्तरीत प्रश्न पुनः केला, "कुणाची तक्रार करणार? गाडीची, मालकाची, डॉक्टरची..............कुणाबद्दल आहे तक्रार?" डिलेव्हरी दवाखान्यात झाली नाही, ह्याची करणार तक्रार? स्वतःच स्वतःची समजूत काढत होतो.
"ती नरस आहे न, सिस्टर, ती आमच्या बरोबर आशीच बोलते. चांगली बोलतच नाही. नाही बोलत. खायालेच उठते. डीलेव्रीच्या वाक्तीबी बोलली की आईन टायमाले आणलं. पयश्यायसाठी. नाही त तुम्ही लोकं थोळेच दवाखान्यात डीलेव्री करता?"
त्याच्या शरीरावर रोंगटे उभे राहिले होते, जसं काही आत्ताच ती नर्स त्याच्याशी हे बोलत होती. तो सांगत होता. उकळत होता, प्रताडणा आणि अपमानाच्या आगीवर.
"हॉस्पिटल मधून पैसे न मिळाल्याची तक्रार करणार?"
"पयश्यायची बात नी भाऊ. नाही भेटलेत नाही भेटले. "
"मग."
"ते काय आहे जवा डीलेव्रीच्या टायमाले दवाखान्यात गेल्तो न तवा ती नरस आहे न, तिनं नाव,पत्ता,वय अगोदरचे किती पो-हं आहे, हे सगळं लिह्याले लावलं. मी सांगल हे आमची पह्यलीच डीलेव्री आहे, त नरस बोलली खोटं बोलतु काय?" मी म्हतल नही सिस्टर खरं सांग्तो,मंग बोल्ली- गावाचं नाव त मी सांगल चापोरा. मंग बोल्ली चापो-यात कुठी राहतू? बोद्धवाळा सांग्ल्यावर नरस बोल्ली कुठी आहे बोद्धवाळा? जवा तिला सांगल तवा ति मह्या कडे पहातच राह्यली. तिच्या पाहण्याचा हेतू होता की आसा वाळा कुठी असतो का? मी बोल्याच्या आगुदरच ती बोल्ली चापो-यात बोद्धवाळा नही म्हणून, तठी त महारवाळा आहे. महारवाळ्यातला आहे? मी बोल्लो महारवाळा नी आमच्या गावात. पहेले होता. आता नी. आता त बोद्धवाळाच आहे. त नरस बोल्ली की मंग तु खोटा बोल्ला. महारवाळा काय गायप झाला. मी तिले सांगत राह्यलो की मी खरा बोल्ल्तो आहे म्हणून. पन ती आईकतच नोह्ती. आनं त्याच्यावर महारवाळाच लीव्हला. महारवाळा चापोरा."
जसं आत मधलं भरलेलं लोखंड गरम होऊन वितळंल. निघून गेलं शरीरावर घाव सोडून. शरीराचे अवयव तोडून टाकल्यासारखे. भाऊसाहेब इंगळे नावाच्या ह्या माणसाचं म्हणणं का नाही मान्य करत ती नर्स? सर्वांनाच माहित आहे की डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर महारवाड्यांना बौद्धवाडा म्हणतात म्हणून. हे माहिती असूनही की बौद्धवाडा आहे म्हणून, तरीही त्याच्या अस्तित्वाबद्दल उठवतात प्रश्नचिन्ह आणि त्याला प्रमाणित करण्याचा केला जातोय प्रयत्न!
मी अजून विचारातच डुंबलेलो होतो की भाऊसाहेब इंगळेन माझ्या खांद्याला हाताने नाही तर दोन बोटांनी हलवलं. हादरून गेलो मी. त्याचं म्हणणं अपूर्ण होतं. तो म्हणाला-"मले हे म्हण्याच आहे की ती नरस माह्य का आयकून घेत नही! जे आम्ही सांग्तो ते का लिहून घेत नही? आमचं म्हणणं का नही मानत खरं?"
" ज्यांना आम्ही माहित नाहीत, जे आम्हाला ओळखत नाहीत तेच आम्हाला प्रमाणित करणार! त्या न ओळखणा-याच्या सहीने आमची ओळख पटते. कधी कधी वाटतं की हा आहे तरी कोण? कुठून आलाय? ज्याच्या पेनाने निश्चित होते आमची ओळख?"तो माझ्याकडे पहातच राहीला आणि मी बोलत. "माहिती आहे, मी दहा-बारा दिवसांपासून भटकतो आहे, भाग- दौड करतो आहे, की मला ओळख द्या. हे प्रमाणपत्र आहेत, हे कार्ड आहे. माझ्या फोटोवर सही करून द्या, सही. कुणाला सांगू , कुठे जावू?"
मी बोलत राहिलो आणि विचार करत राहिलो तोच ती मुलगी मोठ्या उत्साहात बाहेर आली. बाहेर येताच क्लार्कला म्हणाली, "काका माझं काम लवकर करून द्या. पप्पांची शपथ आहे तुम्हाला." त्या मुलीचं हास्य क्लार्कच्या चेह-यावर गेलं आणि परफ्युमसारखं उडालं सुद्धा! जसं काही त्या मुलीचं हास्य त्या क्लार्कच्या चेह-यावर टिकू इच्छित नव्हतं.
ती मुलगी गेल्यानंतर भाऊ साहेब इंगळे नावाचा तो माणूस उठून उभा राहीला. त्याला बघून तो क्लार्क म्हणाला, "तु काय भाड झोकतो की काय इथं?" साहेबाची दटावणी होती, मुलगी निघून गेल्याची बोच होती, की मग आमची एकजूट की हास्य, काय होतं की तो आमचा लचका तोडू इच्छित होता.मला त्याच्यात ती नर्स दिसली जी भाऊसाहेब इंगळेचा लचका तोडत होती.
"मी कम्प्लेट क-याले आलो आहे. कम्प्लेट." तो म्हणाला.
"तर तक्रार पेटीत टाक इथं का टाईम फुकट घालवतो?" सातत्याने तो शब्दांच्या भडीमाराचा बळी ठरत होता.
"साहेबाले भेट्याचं आहे. सांग्याच आहे."
"आता टाईम नाही साहेबांकडे. दिसत नाही किती माणसं उभे आहेत ते, तु काही मोठा तीसमारखा लागून गेला की काय चालला सरळ आत मध्ये? तिथं गेटच्या बाहेर जा, तिथं ठेवली आहे पेटी. डब्बा, बॉक्स ..........समजलं त्यात टाक आपली कम्पलेंड........माहित नाही कुठून कुठून येतात.......कम्पलेंड करायची आहे म्हणे? इथं प्रत्येक जण बसला आहे कम्पलेंड करायला. त्यांना फक्त निमित्तच पाहिजे" भाऊसाहेब इंगळेवर राग काढत माझ्या कडे बघत होता क्लार्क. भाऊसाहेब इंगळेला चांगलाच झटका बसला. तक्रार करायला आला आणि हे ऐकावं लागलं. तो मागे सरकला. तो कुठे उभा आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं.
मला पूर्णपणे कळून चुकलं होतं की भाऊसाहेब इंगळेला चेह-यावरून आणि मला कागदपत्रांच्या आधारे प्रमाणित करून टाकलेलं होतं. नर्स आणि क्लार्क ओळखून होतं की आम्ही कोण आहोत ते!
माझं हास्य माझ्या चेह-यावरून माझ्या सगळ्या शरीरात पसरलं. मी भाऊसाहेब इंगळेचा हात धरला. त्याचा हात गरम होता आणि रागाने परिसीमा गाठायची वाट पाहत आम्ही दोघं दरवाज्याच्या समोर उभे ठाकलो.
"ऐकायला नाही येत का?" क्लार्क ओरडला आणि मी हसत हसत बोललो- "आम्हाला आत जायचं आहे."
"आज टाईम नाही साहेबांकडे सांगितलं नं"
"आता टाईम आमच्याकळे बी नही" भाऊसाहेब इंगळे मोठयाने बोलला तर क्लार्क वरमला. जे लोकं ये जा करत होते ते थबकले. भाऊसाहेबानं त्यातल्या एका माणसाला थांबवलं. मी लोकांकडे बघून हसलो. ज्याच्यात आमंत्रण होतं, आग्रह होता, हात पुढे करण्याचा.
"पांडे काय चाललय? काय गोंधळ लावलाय बाहेर? का थांबवून ठेवलं आहे ह्या लोकांना." आतून साहेबांचा आवाज आला. आणि क्लार्क पराजित, अपमानित होऊन मागे सरकला. भाऊसाहेब इंगळेच्या जळजळीत नजरेनं क्लार्कच्या चेह-यावर शिक्का मारला आणि मी माझ्या हसण्याने सहीची मोहर उमटवली. आम्ही दोघांनीच त्या पांडेला प्रमाणित करून टाकलं होतं.
----------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ हिंदी लेखक -- कैलाश वानखेडे,
बदनावर(धार,म.प्र.) मोबा.९४२५१०१६४४
मराठी अनुवाद -- अरविंद सुरवाडे
उल्हास नगर, जिल्हा- ठाणे
मोबा.९८६९९२१६०३
---------------------------------------------------------------------------------------------------------

2 comments:

alaknanda sane said...

कथा खूप छान आहे.मराठी अनुवाद इंदौर येथून प्रसिद्ध होत असलेल्या "श्री सर्वोत्तम" कड़े पाठवावी,म्हणजे ती जास्त वाचकां कड़े पोहचेल. शुभेच्छा.
अलकनंदा साने.

kailash said...

धन्यवाद .''श्री सर्वोत्तम '' चा पत्ता मिळेल ?