किती बुश आणि कितेक मनु(मराठी अनुवाद )

दिवस मावळतीला गेला आणि नेमका मूड खराब असला की बी. डी. ओ. साहेबांच बोलावणं आलाच समजा. कर्मचारीही मग त्याची वाटच पाहत असतात पण बोलावणं आलं की लगेच जाणार, असं थोडाच असतं. जाणून-बुजून उशिरा जाण्यात त्यांना मजा येते,खूप बरं वाटतं त्यांना की काही क्षण बी डी ओ मनातल्यामनात कुढत राहावेत. खूपच त्रास दिला सल्याने ! लवकर गेलो नाही म्हणून हजार गोष्टी ऐकवतो,ओरडतो. तर आता घे बेट्या ! असा विचार करूनच ते प्रवेश करतात. त्यांना माहित आहे की सगळेच बी. डी. ओ. पहिल्यांदा सरकारला शिव्या घालतात. म्हणून आपलं काय जातं? सरकारचं जातं ! शर्मा बाबून बसण्यापूर्वीच म्हटलं ह्या देशाची सिस्टम खूपच खराब आहे साली.
समजतच नाहीत आदेश. आता हेच पहा .....fax आलेला कागद पुढे करतात "वर बसलेल्या मादर.......नां अक्कल नावाची चीजच नाही. जसं बाबू म्हणेल त्यावर कोंबडा उमटवला म्हणजे झालं. ह्या वरच्या साहेबानं तर कहरच केलेला आहे. माहित नाही काय होईल ह्या देशाच?" बी डी ओ fax वाचत-वाचत बोलला .
ते विसरले की समोर बाबू लोकंच बसलेले आहेत. ते नेहमीच विसरतात म्हणा !
होकारार्थी मान डोलवली शर्माने आणि म्हणाला, "कलियुग आहे साहेब .कलियुग . सगळं
उल्ट-पुल्ट होऊन राहिलंय. धर्म तर रसातळालाच गेला. ज्यांची आमच्या समोर उभं
राहायची लायकी नव्हती ते आता खुर्च्या उबवताहेत"
""वरचे सुद्धा तर खुर्च्याच उबवताहेत. ते तर आपलेच आहेत. त्यांची
अक्कल काय गहान पडली आहे काय?" बी डी ओ चा रागाने तिळपापड झाला त्यांना चांगलाच
माहिती आहे शार्माजीच्या बोलण्याचा अर्थ.
"डोकं चक्राऊन जातं कधी-कधी." शर्मा माघार घेत नाही, "डोकं" उपरोधिकपणेच बोलले
बी डी ओ. प्रश्नाचं उत्तर आहे कुणाकडे ! कुणी काहीही बोललं नाही कुणाला शिव्या
घालाव्यात काही कळेनासं झालं तेंव्हा सर्व शांत बसले.
"बऱ्याच दिवसांपासून पाहतोय हा कमल ना पाणी पाजतोय ना चहा."शर्मानं
विषयांतर केलं.
"अरे ओ तर आता झाडूला हात सुद्धा लावत नाही."
श्रीवास्तव बाबूंनी अशा पद्धतीनं सांगितलं जशी काही एखादी नवीन गोष्ट सांगावी.
"बस्सं computer मध्ये घुसून बसलेला असतो. भो.....डीचा" शर्माला रागच
आला
"आपली औकात विसरला औकात. ज्यांचे बाप जादे झाडू मारत आले आणि हे
आम्हाला शहाणपणा शिकवताहेत !" श्रीवास्तव बाबूंनी शर्माच्या रागाला हवा दिली.
"त्याची आई काय करत होती, स्साला विसरला वाटतं? आठवण करून द्यावी
लागेल .......त्याचं काम आहे ते ! सेवा करणं......."बी डी ओ च्या टेबलाजवळ
ठेवलेल्या प्लास्टिकच्या छोट्या बादलीत थुंकल्यानंतर बोलता-बोलता त्यांनी
घोषणा केली, "कलियुग आहे साहेब, कलियुग"
"आगे आगे देखो होता है क्या ?" श्रीवास्तव बोलला.
शर्माला माहिती आहे त्याच अशाप्रकारे थुंकण बी डी ओला पसंत पडलं
नाही म्हणून मीही काही कमी नाही ह्याच अर्थानं थुंकला होता तो, आपल्या मनातले
भाव लपवत म्हणाला, "आता हेच पहा ना ! बी डी ओ च्या वर सी ई ओ ला बसवलं. ज्याला
काळ पर्यंत चड्डीचा नाळा बांधता येत नव्हता तो आता आम्हाला शिकवायला लागला." आग
लावणे, मग नंतर विझवण्याचा प्रयत्न करने, नंतर थोडी फुंकर मारणे ....अशी रणनीती
ठरउनच करतात ते.
"मागच्या हपत्यात तर कहरच केला. मी त्याल बोलावलं पण तो आलाच
नाही. काय भाव वाढला त्याचा !" श्रीवास्तवने चहाचा घोट घेतला. त्याचा त्याला
चटका लागला.
बी डी ओ समोर बसलेल्या शर्मा बाबूच्या ढुंगणांनी खुर्चीचा तळ सोडला.
मान खुर्चीच्या मागच्या भागाकडून खाली गेली आणि श्रीवास्तव बाबूने आपले पाय
पसरवले, हे दाखऊन देण्यासाठी की, बी डी ओ साहेब आता तुम्ही आमचे मोठे साहेब
राहिला नाहीत. आम्ही तुमच्या समोर कसेही बसू शकतो, काहीही बोलू शकतो. बी डी ओ
समजून चुकले आपली पदावनती ! सगळा असभ्यपणा मान्य केला त्यांनी. ऑफिसमध्ये एकट
पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता ते निमुटपणे ऐकून घेतात. ते आता तोंडाने
खूपच कमी बोलतात. मनातल्या मनात मात्र त्यांचा कायम संवाद सुरु असतो. त्यांना
वाटतं की एका लाईनीत सगळ्यांना उभं करावं. ज्यांच्यामुळे ते आता बॉस
राहिलेले नाहीत. सगळ्या अधिकारी- कार्मच्याऱ्याना ते एका लाईनीत उभं करू
इच्छित होते. त्यांना वाटायचं की सगळ्यात आधी शर्माला आणि श्रीवास्तवला उभं
करावं आणि एक चांगला कानाखाली आवाज काढावा संपूर्ण ताकदीनिशी आणि दाखऊन द्यावी
त्यांना त्यांची हद्द . त्यांची औकात. त्यांना सगळ्यांना बोलावून त्यांचे कपडे
उतरवावेत आणि त्यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्यावं. ते मनातल्यामनात
तैयारी करतात कानफटात मारण्याची. एवढी वर्षे कार्यालय प्रमुख राहिल्यानंतर एका
आदेशान्वये ते अधिनस्थ झाले आणि जे कधी त्यांच्या अधीन होते ते एक थातूरमातुर
परीक्षा देऊन सीईओ झालेत. बोचतं हे सगळं मनात खुपतं आणि कर्माचारयांवर निघतं
कर्मचारी आता बीडीओचं बोलणं गांभीर्याने घेत नाहीत- सवयच करून घेतली त्यांनी.
वाईट वाटतं बीडीओला बीडीओ मोठ्या साहेबाचे छोटे साहेब झालेत. छोटा साहेब होणं
आणि तेही आपल्या त्याच ऑफिसात ! सहन होत नाही पण करणार काय ?
वीज गेलेली. खिडकीतून हवा येत नाही. में महिन्यातल्या रखरखत्या
उन्हामुळे अंगाची लाही-लाही झालेली.एकीकडे मूड अपसेट व्हायला निसर्गानं योगदान
दिलेलं तर दुसरीकडे आपापल्या विवंचनेनं सगळ्यांची डोकी ठणकलेली.
शर्मा उठला अन खीडकीकडे जाऊन थुंकून आला कुणी काही बोलणार त्या अगोदरच
चालता- चालताच म्हणाला, "आता जर काही थोडं जास्त बोललो तर हे लोक लगेच आपल्या
जातीवर जातात. हज्जार नाटकं आहेत साले"
"सगळ्या सिस्टमची ऐसी की तैशी करून टाकलीय. आता ह्या अनुकंपा
तत्वावरच्या नेमणुकांची काय गरज? आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचे दरवाजे असेही बंद
करून टाकलेले. ह्यांना तर राखीव कोट्यातून नोकऱ्या मिळतात. सगळं वोट
बँकेसाठी विशेष भर्ती मोहीम चालू आहे साली!" श्रीवास्तव थोडं थांबला अन पुनः
म्हणाला "कुठे मेला हा साला चहावाला....?"
दर वर्षी तर चालते विशेष भर्ती मोहीम पण नोकरी तर मिळत
नाही कुणालाच. नाटकं आहेत नाटकं" खान बाबून आपली उपस्थिती नोंदवली.
"आमच्यासाठी तर नाटकंही नाहीत. आशा हि नाही." श्रीवास्तव पुनः
दरवाजाकडे पाहत म्हणाला, "मादार....कुठं गेलाय. चहा आण म्हणावं"
"अनुकंपा तत्वावर तर सगळ्यांनाच नोकरी लागते उद्या खुदा-ना-खास्ता
बड्या बाबूच काही बरं वाईट झालं तर भाभीजीना लागेलना नोकरी" खान बाबू जेवढं
सहजतेनं बोलून गेला तेवढाच शर्मा अस्वस्थ झाला. "मी का म्हणून मरू ?
तू मर ना अन लाव तिथं आपल्या बायकोला."
"तिला तर क्लास फोरचा जॉब मिळेल. मारणार झाडू."
काहीही धरबांध न ठेवता श्रीवास्तव बोलला मात्र दिशा भरकटली.समजून
गेला शर्मा अन जवळ जवळ ओरडतच श्रीवास्तवची गोष्ट विचारण्यासाठी म्हणाला,"त्या
हरामखोराला बोलवा. बघतो त्याला. आपल्या पायरीन वाग म्हणावं. computer
ची ऐशी की तैशी. नाही करायचं आम्हाला computer वर काम.इथं चहा-चहा
करून घशाला कोरड पडलीय. साला समजतो काय स्वतःला ? " उठून उभा राहिला अन
बोलत-ओरडत व्हरांड्या पर्यंत जाऊन आला.
सरळ सरळ
मला शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली बसलेल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक
आहे की, त्यांचा आवाज माझ्या पर्यंत पोहचतो आहे आवाज खिडकीतून, दरवाज्यातून
माझ्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आदळतो आहे माझ्या डोक्यावर. डोकं जड झालंय पण
वाचा कुठे तरी हरवलीय; कुठल्या तरी दाट जंगलात. कुठल्या तरी
जुन्या सडक्या ग्रंथातील कुठल्याशा श्लोकात. दाबली गेलीय
कुठल्यातरी मंदिराच्या गाभारयात शेवटी काय झालंय माझ्या वाचेला. माहित नाही.
खरंच माहिती नाही . एवढं मात्र नक्की की माझ्या मनात आक्रोशासारखं काही तरी
नक्कीच जन्म घेऊ पहातय. की बोर्डवर माझी बोटं झरझर उमटू लागली.
ह्या ऑफिसचं कॉम्पुटरचं काम शर्मा बाबूच्या मुलाच्या दुकानातून
व्हायचं. त्याचं दुकानातून झेरॉक्स आणि fax ही व्हायचेत. कॉम्पुटरचं काम
माझ्याकडे यायला लागलं तर fax ऐवजी ई- मेलची संख्या वाढली आणि दोन्ही कामं जवळ
जवळ बंदच झालीत जी त्या दुकानातून व्हायची. सगळ्यात भारी पाडायचं ते fax चं
बिल. एका पानाचे चाळीस रुपये व्हायचे.fax चं बिल यायचं अवकाश की दुसऱ्या
दिवशीच त्याचं पेमेंट व्हायचं. फक्त हेच एकमेव दुकान आहे की ज्याचं पेमेंट
एवढ्या लवकर व्हायचं ऑफिस जवळच्या ह्या दुकानाचा पुरेपूर फायदा घेतला जायचा.
fax इनकमिंग असल्यास त्याचे पंचवीस रुपये चार्ज पडायचा. इनकमिंग fax सुद्धा
खूप यायचे. शर्मा बाबू फोनवर नेहमीच म्हणत की, ते पत्र आमच्याकडे
अजूनपर्यंत पोहचलचं नाही. तुम्हाला तर माहीतच आहे पोष्टाचा कारभार.
प्लीज एक करा ते पत्र ताबडतोब fax करून टाका आत्ता माहिती देतो.
पोष्टल्या गोंधळाच्या नावावर अनेक पत्र दाबून ठेवायचा शर्मा, आणि
वरच्या ऑफिसातून fax मागवायचा. पाच रुपयाचं काम चाळीस रुपयात व्हायचं आणि
शेकडो पत्र उज्जैन, भोपालच्या नावावर चढवले जायचे. अर्जंटच्या नावावर fax
व्हायचेत आणि वरून म्हणायला मोकळे की, शिपायाला कुठं -कुठं पाठवायचं.
बिच्चारा एक तर परेशान होणार आणि वरून त्याचा चारपट टी ए डी ए. तर fax
काय वाईट. वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाचवायचं तर करा fax .
सगळ्यांना माहित आहे की बचतीचा दावा केला जातोय, बचत होत नाही पण तोंड
कोण उघडणार? जो बोलणार तो वैर पत्करणार. ह्या विषाक्त वातावरणात जेही बोललं
जायचं किंवा शारीरिक हालचाल व्हायची त्याचे अनेक अर्थ, मायने काढले जात.
स्पष्टीकरणासाठी आपणास वेळ मिळत नाही; माणसं दिसत नाहीत. कोण कुणावर नाराज,
माहित नाही. परंतु सगळ्यांना माहित आहे की, नोकरी तर मला मिळाली आहे
शिपायाची पण बसून असतो खुर्चीवर कॉम्पुटर समोर, पाणी पाजणारा,
चहाचे उष्टे कप उचलणारा मी कॉम्पुटर वर काम करतो. मला कल्पना आहे. परंतु मला
ह्याचा आनंद होतो की त्यांना माझी क्षमता दाखवण्याचा मला मोका मिळतो की मी
चहा देण्याऐवजी इथं बसून काम करू शकतो. अधिकारीही माझ्या आनंदाचं मोल
वसूल करतात, कॉम्पुटरवर सगळं काम करून घेतात. चापाराश्याच्या पगारात ऑपरेटर
कुठ्न मिळणार?
मला काय माहित की इथं माझे दुश्मन असतील म्हणून. काय म्हणून ते
माझ्याशी दुष्मनी करतील? मी विचार करतो. मी चुकीचाच विचार करतो. इथच सुरुवात
झाली होती सात वर्षात कळून चुकलं की मी ह्या ऑफिसातल्या लोकांसारखा नाही
म्हणून.मला समजलेल्या अनेक अर्थामध्ये एक अर्थ हा होता की, मी
कुठल्याही स्पर्धेशिवाय इथं आलेलो आहे मतलब माझ्या मध्ये नाही कुठलीच लायकी.
म्हणजे माझ्यात एका चपराश्याचीही योग्यता नाही. ह्याचा अर्थ असाही आहे की मी
क्लार्कचं काम करण्या बरोबर नाही करत साफसफाईचं काम की हातही नाही लावत झाडूला
तीन वर्षांपासून. कुणाला पाणी द्यायला जायचा अवकाश की टायपिंग करणारा क्लार्क
मला अडवतो, न म्हणतो पहिल्यांदा टायीप करून दे नंतर बघ बाकीचं पण नंतर
मग राहून जातं बघायचं. तर पाहून घेऊ चा वाढतो भाव. सगळं कळत पण तिकडे जातो तर
इकडचा माणूस छातीवर उभा असलेला दिसतो अगोदर डोळे आणि नंतर मोठ्या
नाट्यमयरित्या आपली वाणी मिठास करत. ह्या सगळ्या झमेल्यात शर्मा बाबू बरोबर
दुष्मनी झाली. हे गणित बऱ्याच महिन्यानंतर लक्षात आलं की, शर्माच्या मुलाच्या
कॉम्पुटर आणि fax च्या कामात बाधा आणली म्हणजेच सरळ सरळ होणारी कमाई बंद केली
श्रीवास्तव बाबूच्या बायकोचं फाईल टायीप न करून देण्याची फळं अशी भोगतोय की आता
सगळ्यांच्याच प्रत्येक कागदाला टायीप झाल्याशिवाय बाहेर न पडण्याची सवयच
झाली.कॉम्पुटर कॉम्पुटर राहिलाच नाही तो आता एक टायीपरायटर झालाय. प्रत्येक जण
चढून बसतो. सगळ्यांनाच इमर्जंशी. पण माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही की मी किती काम
करतो ते. ना की कुणी समजून घेत !
हे तर मला सुद्धा माहित नाही की निवांतपणे मी कधी जेवलो की नाही ते.
चपाती कधी गरम तर कधी बासी. वेळ सुद्धा सकाळचे नऊ आणि रात्रीच्या अकरा च्या
आसपासचा. ऑफिसचं टेन्शन बापाच्या शिव्या अन बायकोच्या टोमण्यान्बरोबरच सततच्या
कामामुळे ना झोप पुरी होते ना पोटभर जेवण. पोट खराब व्हायला लागलं डॉक्टराना न
विचारताच मेडिकल स्टोअर्स मधून गोळ्या घेतो, ज्या कधी डोकेदुखीच्या तर कधी-कधी
कब्ज-पित्तासाठी असतात. हा प्रकार गेल्या पाच सहा महिन्यापासून जरा जास्तच
वाढला.
छोट्या साहेबानं बोलावलं.हे नेहमीचचआहे की,बोलावलं तरीही छोटे साहेब
म्हणजे बी डी ओ साहेब फाईलीमध्येच डोकं खुपसून असतात आणि त्यांच्या समोर
जिवंत माणूस तसाच उभा राहतो जसं एखादं निर्जीव फाईल,जोपर्यंत दुसरा एखादा
त्याला उघडणार नाही. फाईल बनण्याच्या प्रक्रियेतच मी उभ्या-उभ्या साहेबाला
नमस्कार केला.
"अरे कधी पासून उभा आहे?" फाईलीमधून बाहेर आले छोटे साहेब.
"बस्स नुकताच आलो." चलबिचल झाली उत्तर देताना. हा प्रश्न तसा अनपेक्षित
होता. आदेश द्यायच्या ऐवजी क्षेमकुशल विचारणं.
"अरे उभा का आहेस?"
"जी सर" उत्तर नाही. कसं असेल? उभा याच्यासाठी आहे की उभं राहायचीच तर
नोकरी आहे. आदेश ऐकणे आणि त्याची तामील करने ह्या कात्रीत वाटलं की
साहेबाला काय प्रमोशन तर नाही भेटलं एव्हढे प्रेमाने बोलताहेत ते. हे कधीच सरळ
बोलत नाहीत अन आज....नजर वर-वर जात भिंतींवर फिरू लागली. कुठे धूळ बिळ घाण तर
नाही....मग टेबलाच्या आसपास डोळ्याला कचरा दिसला नाही. रागावण्याची
नवी स्टाईल असावी? रागावण्या व्यतिरिक्त काहीही न करू शकणारा आज प्रेमाने
बोलतोय तर अस्वस्थ व्हयला लागलो मी.
"बस"
"नको साहेब उभाच ठीक आहे." कमाल झाली. बसायला सांगताहेत. ज्यानं ऐकलं
असेल की मला साहेब बसायला सांगताहेत, त्याला एकतर आपल्या कानात दोष किंवा
साहेबाचा स्क्रू ढिला झाल्याचं वाटलं असेल. जसं मला वाटतयं सात वर्षे म्हणजेच
२६४२४ दिवसात पहिल्यांदा ह्या प्रकारचा संवाद होतोय.
"बस बाबा...ऐकून घे"
"नाही सर....ठीक आहे सर....सर काय आदेश सर"
"पहिल्यांदा बस तर खरं मग सांगतो."
"नाही सर मी....."
"बरं असं कर. दोन कॉफी सांगून ये."
आनंददायक वाटलं. खुशीने ओसंडलो शरीरात उर्जा संचारली. साहेबांनीच
भरली. मनात एकाच वेळी अनेक गाण्यांचा आवाज घुमू लागला ढोल आणि तमाम वाद्ये
एकत्र झंकारु लागली. ऑफिस बाहेरच्या टपरीवाल्या दयालुला म्हटलं,"जरा स्पेशल दोन
कॉफी बनव."
"बराच खुश आहे. काय लॉटरी लागली काय?" दयालु
टपरीचा भाडेकरू बोलला.
"नाही लॉटरी-बिटरी काय मन मोठं झालंय"
"स्टूलवर बस यार."
आज सगळेच मला बसायला सांगताहेत. ह्या टपरीवर असलेल्या स्टुलावर
कुणालाही बस म्हणत नाही दयालु. मला सुद्धा नाही. मी बसतो.
टपरीवर चार काचेच्या बरण्या आहेत, ज्यात शेव, फरसाण, डाळ,
शेंगदाणे, आहेत. दयालुला बरयाचदा मुरमुरे,चणे ठेवायला सांगितलं. पण ऐकत नाही.
मुरमुरे वातड होतात. राबरासारखे. खाण्याचा सगळा स्वाद बिघडतो आणि इथल्या
चण्यांची चव काही चांगली नाही जशी पाहिजे तशी. आज माझी शेव मुरमुरे खायची इच्छा
झाली. कित्ती वर्षे झालीत शेव मुरमुरे खावून? शेव मुरमुऱ्यांनी घर आणि
मित्रांची एकदम आठवण करून दिली. वडाच्या झाडाच्या आधाराने टपरी ठेवलेली आहे
वडाच्या सावलीतच बसतात लोक चहा पिणारे आणि
बरण्यांमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा नास्ता करणारे. दोन रुपयाच्या
नाश्त्याबरोबर एक चहा घेतला जातो आणि त्यांच मन शांत होतं की आज पोटाची आग शमली
म्हणून. तन-मन एक दुसऱ्याला साथ देतात आणि वाटतं आजचा दिवस सफल झाला. पिज्झा
आणि बर्गरच्या सगळ्या जाहिराती परग्रहावरील माणसांसाठी वाटतात. पेपरात वाचतो
आर्थिक विकास झाल्याचं अन देश महासत्ता होणार असल्याचं. तेंव्हा वाटतं की
त्यांचे संपादक अन रिपोर्टर जाहिराती देणाऱ्या ग्रहांवरचेच रहिवाशी आहेत.
"दिवाळीच्या निमित्ताने विशेष सुट देणाऱ्या
जाहिरातींनी वर्तमान पत्राची सगळी पानं रंगवलेली आहेत वर्तमान पत्र तर
कंपन्यांचे भाट बनलेत जणू." मी दयालुला म्हटलं, ज्याचं वय चाळीसच्या आसपास
आहे आणि केस थोडे पिकायला लागलेले आहेत, ज्याची तीच जुनी प्यांट, एका टी शर्ट
बरोबर सात फेरे घेतलेली, त्याने तेच घातलेले. अन कुटून ठेवलेलं
आलं चहाच्या पातेल्यात टाकून एका मळकट कपड्याला हात पुसत,उकळणाऱ्या चहा
कडे पाहत म्हणाला, "तूच सांग काय चाललं ते?"
" आज तर कमालच झाली. छोट्या साहेबान प्रेमानं हाक मारली. बस म्हणाला."
"जरूर काही तरी गडबड आहे. कुत्रा भुंकायचा थांबला म्हणजे नक्की चावा घेणार. थोडं सांभाळून राहा."
"तुला तर प्रत्येक गोष्टीतच खोट दिसते."
"ह्या डोळ्याचं काय करू ?"
"त्यांना फोडून टाक. माहित नाही साले काय काय वाचतात आणि पाहतात. ते असायलाच नको होते. मी तर म्हणतो ज्याच्या जवळ कार असेल त्यालाच डोळे असावेत." आम्ही दोघंही हसलो. हसण्याच्या उबारयातच मी साहेबांकडे परत आलो.
"बस बाबा कमल."
न सुटणाऱ्या कोड्यात पडलो मी. ओबड-धोबड फरशी. त्यावर मांडलेल्या खुर्च्यांची अवस्था सुद्धा वाईट. पण त्या खुर्च्या होत्या. त्या खुर्चीवर? ते ही साहेबांच्या समोर बसायची हिम्मत नाही करू शकत. परंतु एवढा आग्रह करूनही न बसण्याची हिम्मत केली.
कॉफी आली तर दुसरा कप माझ्या बाजूनं सरकला. आल्हादायक क्षण जो सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा आला. कॉफीच्या घुटक्या बरोबर आनंदाची एक लहर नसानसातून सगळ्या शरीरात रक्ताच्या जोडीनं संचारली. इंटरनेटवर गो क्लिक करताच स्क्रीनवर चक्र गोल-गोल फिरावं अगदी तसं मला एवढं आश्चर्य झालं की जे काम मी ऑफिस मध्ये करतोय ते छोट्या साहेबांना कसं समजलं आणि त्या बाबत ते इतकं डिटेल का विचारताहेत म्हणून! सगळी माहिती घेतल्यावर साहेब म्हणाले,"चांगलं काम करतोय. आपल्या देशाबद्दल आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.आपण कुठेही असोत, कुणीही असोत, शक्य तेवढं चांगलं काम केलं पाहिजे....काही त्रास असेल केंव्हाही सांग. ठीक आहे !" छोट्या साहेबांच्या डोळ्यात देशप्रेम आणि माझ्याबद्दल आपलेपणाच दिसला. आणि मला सगळ्यात मोठ्ठ सुख मिळालं. एक महिन्याच्या ट्रेनिगला गेलेले आहेत सी ई ओ त्यांच काम पाहताहेत बी डी ओ. बी डी ओना कमलच्या प्रोग्रामिंगची माहिती मिळाली तर पंधरा दिवसानंतर होणारया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्र्यांसमोर स्वतःला कार्यक्षम साबित करण्याचा विचार आला. प्रमोशन असंही मिळतं किंवा ह्या सी ई ओला कायमचाच घालवून देवू आणि सी ई ओच्या अडीशनल चार्ज मध्ये राहिलो तर काय वाईट?
मी मागच्या दोन महिन्यांपासून आकडे आणि नावांच संकलन करून एन्ट्री करतो आहे. टी एक प्रकारची नशाच म्हणाना, की टेबलाटेबलावर फिरून बाबू लोकांबरोबर माथापच्ची करून जुन्या फायीलींवरील धूळ झटकत त्यांना वर्ष, योजनानिहाय करत जनरल, एस.सी, एस. टी च्या कॉंलम मध्ये करत राहिलो. जुन्या फायीलीत लाभार्थ्यांची माहिती शोधायला बरेच कष्ट पडताहेत. रेकॉर्डवरून बऱ्याच बाबुलोकांबरोबर तन तनीही झाली. खरं कारण म्हणजे जेवढी संख्या सांगितली जायची तेवढी नावं फायीलीत नसायची. म्हणून तर श्रीवास्तव बाबू म्हणाला होता, "काय फरक पडतो लिहायची एवढीच हौस आहे तर लिहून टाक ललवा, फलवा, रामदिन....कोण ट्याली करतोय? आकडे बरोबर असणं महत्वाचं, नावात काय ठेवलंय?
"नावात बरंच काही असतं" मी म्हटलं
"चूप बस, लिहायचं तर लिह. आता वेळ नाही माझ्याकडं "
"पण ...."
"तर जा साहेबांकडे न घे नावं त्यांच्याच कडून. इथं का मगसमारी करतोय?"
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना एकत्र करून त्यांचा फायदा लोकांना कसं देता येऊ शकतो? हे software तयार करून प्रोग्रामिंग करतोय. सगळ्यांना माहिती आहे की हे काम मी कुठल्याही वरच्या आदेशाशिवाय करतो आहे, किंवा साहेबानीसुद्धा मला हे काम करायला सांगितलं नाही म्हणून. त्यामुळे सगळे टाळाटाळ करतात. माझ्या लक्षात आलं होतं की त्यांच्या बरोबर बोलण्यात काही अर्थच नाही. परत आलो. उद्या बघू. आज श्रीवास्तावजीचा मूड ठीक नाही समजून मी पुनः काम्पुटर मध्ये घुसलो. मी माझ्या प्रोग्रामिंग मध्ये गावांची सन २००१ ची वर्गवार आकडेवारी फीड केलेली होती. आता ह्या ७२ गावात कुणा-कुणाला कोण-कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळाला, कुणाला कुठल्या स्कीम मधून कर्ज मिळाले ह्याची माहिती भरणार. त्याच बरोबर प्राथमिक -माध्यमिक शाळांतील मुलांची संख्या, आणि ती कुठे असावी ह्या आकडेवारीशी झटापट करत होतो. ह्या माहिती आणि आकडेवारीच्या आधारे अनेक सोयी-सुविधा रिलेट करून गावाच्या गरजा निश्चीत करत होतो. ह्या कामानं मला पुरतं वेड्यासारखं झपाटून टाकलं होतं.
"मोठा शहाणा झालाय," शर्मा हसत हसत म्हणाला.
"तू आता योजना आयोगातच जा. तुझी खरी गरज तिथेच आहे. इथं एवढा विचार करने उपयोगाचे नाही."श्रीवास्तव बाबूंनी री ओढली.
"मी तर म्हणतो तो इथल्या लायकीचाच नाही" शर्मा पुनः हसला.
"तर मग नालायक आहे ...."श्रीवास्तव खिल्ली उडवत म्हणाला.
"श्रीवास्तव तुलाही कळेल, म्हणजे ......."
"धूळ आणि कोळीष्टकानी भरलेल्या खोलीतील हसण्याच्या गदारोळात मी काहीही बोलू शकलो नाही. माझ्याकडे प्रतिकारासाठी जे शब्द होते ते जळमटांत अडकले निरपेक्ष भावनेने मी पुनः फाईली शोधू लागलो. फाईलीचा ढिगारा अशा त-हेने पडलेला आहे की, एखाद - दुसरा क्लार्क सुद्धा त्यातून संबंधित फाईल शोधू शकणार नाही.आपलं टेबल, आपलं कपाट आपल्या हिशोबाने सोयीनुसार व गरजेनुसार फाईली ठेवलेल्या आहेत. टेबलावर ठेवलेल्या फाईलीना दुसरा कुणीही डिस्टर्ब करू शकत नव्हता.कपाटाच्या आत बाहेर ठेवलेल्या फाईली कुजण्याच्या मार्गाला लागलेल्या होत्या. जेंव्हा सर्व माहोल सडून गेला तेंव्हा शांततेचा भंग करत शब्द बाहेर पडले, "सडून जाणार ह्या फाईली, त्यांचं काम्पुटरीकरण करून घ्या" खान बाबू बोलला तर कुणीही खिदळंल नाही हास्याची लकेर पसरली शर्मा बाबू सोडून बाकी इतर चेह-यांवर.
"कश्या कश्याच काम्पुटरीकरण करणार? जो भेटायला येतो, जो काम घेऊन येतो त्याच करणार काम्पुटरीकरण?"शर्मा रागात येत बोलला
"ते का म्हणून भेटणार?अर्ज केल्यानंतर त्याला पावती द्या नंतर दुस-या दिवशी खिडकीवर माहिती उपलब्ध होईल!"मी अर्ज करण्याच्या प्रक्रीयेबद्दल बोललो.
"आम्ही लोकं......?तुझे इरादे काही चांगले दिसत नाहीत. तुला वाटतं आपलंच राज्य असावं ऑफिसात. ह्याचं काम्पुटरीकरण त्याचं काम्पुटरीकरण......करणार कोण? तू....चालवणार. कोण....तू .....अन आम्ही काय ......भाड झोकायला येणार इथं .....नको गड्या आपलं डोकं नको खाऊ "शर्मा बोलता-बोलता खवळला.
"सगळ्यांनी शिकायला पाहिजे काम्पुटर....तसं ही सरकार म्हणतं की प्रत्येक क्लार्कला यायला पाहिजे म्हणून." प्रतिवाद म्हणून मी उत्तर दिले.
"सरकार तर बरंच काही म्हणते....करू इच्छिते सरकार. सरकारला वाटते काम्पुटर द्वारा आम्ही पी टी उषा बनावं.....हा..हा...सरकत सरकत चालते ते सरकार." शर्मा रागात येऊन हसायला लागला.
"जे सरकतं ते सरकार" श्रीवास्तव बाबू बोलला.
"हा सरकला तर ह्याला वाटतं मीच आहे सरकार. सरकार तर आम्ही चालवतो. म्हणून तर सरकारला अंध-बहिर म्हणतात" शर्मा पुनः हसला.
"सरकार तर म्हणते मुलांना लैंगिक शिक्षण द्या. त्यांना काय माहित इथं पैदा होताच मुल समजतं सेक्सचा अर्थ." श्रीवास्तव बाबूनं विषयांतर केलं. ती त्यांची खासियतच आहे.
"घ्या हा आत्ता आम्हाला सेक्स बद्दल ही सांगणार. त्याला नाही माहित की किती लोकांना वाटेला लावलं ते !" शर्माला जोर चढला.
"शर्माजी खरं आहे तुमच. चूक काय आहे त्यात?" श्रीवास्तव बोलला.
"तुमचाही स्क्रू ढिला झालाय वाटतं. हा आपल्या संस्कृतीवर हल्ला आहे."
"आमच्या बेडरूमवर हा हल्ला.....?" श्रीवास्तव बोलला आणि सगळे शांत झाले.
काम्पुटरीकारणाचं काम जवळपास अश्याच गोष्टींमुळे बंद करावं लागतं, परंतु मी त्यांच्या टेबलावरून मला आवश्यक ती आकडेवारी शोधतो आणि तिची एन्ट्री करून घेतो. मागील वर्षाच्या आकडेवारी पासून सुरुवात केली होती.जर बाबूलोकांनी स्वतःहून फाईली दिल्या असत्या तर सहा महिन्याचं काम एका महिन्यात झालं असतं. चला आज नाही तर उद्या काम नक्कीच होईल ह्याचं मात्र समाधान होतं. कुठलं प्रेशर किंवा टार्गेट तर आहे नाही. पण कारण काय माहित नाही, शर्मा आणि श्रीवास्तवच्या बोलण्यानं माझ्या मेंदूच्या शिरा मात्र आज ताणल्या गेल्या. अस्वस्थता आणि रागाबरोबरचं काम्पुटर चालवता चालवता डोकं दुखायला लागलं आणि चक्कर आलेत.
दवाखान्यात शुद्धीवर आलो तेंव्हा कळलं की मी उभ्या उभ्याच खाली पडलो होतो. सरकारी दवाखान्याच्या मोडक्या पलंगावर मोडून पडलो होतो मी. पिचकलेल्या सलाईनमधून थेंब थेंब माझ्या हाताच्या नासेमध्ये उतरत होता. सलाईनच्या जागी बायको दिसत होती, पिचकलेली. कित्ती वर्षे झालीत डोळे भरून पाहिलं नव्हतं कल्पनाला. एवढ्या वर्षात किती दिवस माझ्या बरोबर वाहून गेलेत. चमकता दमकता चेहरा कुठे सोडून आलेली,ही तर कुणी दुसरीच आहे निर्जीव, जिच्या डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळ तयार झालीत, नैराश्याच्या सैन्यानं घेरल्यासारखी. एकटीच दिसली त्या सैन्यासमोर.कल्पनाने तिचा हात माझ्या तळहातावर ठेवला. गार....अत्यंत गार हात. थंड्या हाताची आग संपूर्ण शरीरभर पसरू लागली आणि मला रडू कोसळलं. डोळ्याच्या पाणावलेल्या कडा बघून तिनं तिचा हात माझ्या कपाळावर ठेवला. मी आहे ना च्या आश्वस्त भावनेने !
मी आहे ?
वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी दवाखान्यात पलंगावर का आहे? माझा मलाच प्रश्न. पलंगावरच होती आई सुद्धा. पलंगावरच आले होते चक्कर. पलंगावर आहे मी आणि चक्कर, आई......आईची आठवण येऊ लागली. आई असती तर मी इथं नसतो. आई.....खोकलत पलंगावर पडलेली, इथेच ह्याचं दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला होता आईनं.
आई .
माझ्या डोळ्यातून आसवं ओघळू लागलीत. मरणासन्न आई पलंगावर दिसायला लागली.
आई.
मी मरू इच्छित नाही. माझी बोलती बंद झाली. आतून शब्द आले आणि थांबले.
आठ दिवस दवाखान्यात काढून चार दिवस घरी राहिलो. ह्या दरम्यान सौम्याला व्हायरल झाला व्हायरल सगळ्या जिल्ह्यात पसरलेला होता. तापानं फणफणणारं शरीर, मोडून पडणारं शरीर काही एक उपाय नाही त्याचा कमजोर झालीय सौम्या. बोललं सुद्धा जात नाही तिच्याकडून. पडूनच राहते. तसाच आलो ऑफिसात.
ऑफिस मधून घरी परततो. घरात पाऊल पडताच चिडचिडेपणाने भरलेलं घर स्मशान शांततेत परावर्तीत होतं. प्रत्येक नजर माझ्यावर रोखलेली आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हिशोब माझ्याकडे मागत,मला अपराधी घोषित करते. दर दिवशी अपराधी सिद्ध करतात मला तमाम नजरा. नजरेला भिडत नाही माझी नजर.घाबरते. खूप मोठ्ठा गुन्हा करून परतलोय खूप वर्षानंतर हाच विचार असतो डोक्यात. कडेलोट तर तेंव्हा झाला जेंव्हा स्वतःच स्वतःला अपराधी घोषित केलं. गुन्हा कुठला शिल्लक आहे, हाच प्रश्न माझ्या अंतर्मनात घुमतो आणि मी भारतीय दंड संहितेच्या व्यतिरिक्त त्या तमाम पोथ्या आणि मुठभर लोकांच्या भाषेत लिहिलेल्या ग्रंथांच्या पानांत समाविष्ट होण्याची ईच्छ्या धरून झोपून जातो.
सुखासाठी त्रस्त असं चार लोकांचं कुटुंब. बायको, बाप, मुलगी अन मी. हे आहे आमचं कुटुंब बायको अन बापाचं पटत नाही. अबोल राहून केवळ टोमणे बाण मारल्या सारखे चालतात आणि हे बाण एका जागी नाही लागत, ते सर्व घरभर मारले जातात. चौघांना हे तोम्ण्याचे बाण घायाळ करतात. चौघांच्या बोलण्यातून निघतात आणि त्वेषाने सर्व दूर घुसतात. काम्पुटरवर गेम खेळताना दुसऱ्या बॉलला मारल्या नंतर एखादं पात्रं स्वतःच शक्तिमान होतं अगदी तसंच.
सकाळ बापाच्या उठण्यान होते. भांडं पडणार, त्याचा झनझनाट सगळ्या घरात पसरणार आणि आमच्या स्वप्नात येउन आम्हाला म्हणणार, उठा. बापाच्या उजव्या हाता-पायांनी काम करणं बंद केलेलं आहे. प्यारालीसीसचा अट्याक चार वर्षा पूर्वीच आला होता. बरीच धावपळ केली पण काही उपयोग झाला नाही. विश्वास नसतानाही बापाच्या म्हणण्यानुसार भ्गातांपासून तमाम मालिश करणारांकडे घेऊन गेलो. कुठे तरी उपचार होतील म्हणून. ह्या सगळ्या धावपळीत घरची परिस्थिती मात्र बिघडली. ऑफिस अन बापाच्या धावपळीत बेघर झाल्यासारखा झालो. खाणं, झोपणं,आंघोळ ह्याच्या पलीकडे घराशी असलेलं नातंच तुटलं. बायकोपासून कधी दुरावलो कळलंच नाही.
बापाच्या उपचारात सगळे प्रयत्न फोल ठरले तेंव्हा बाप म्हणाला, "प्रायव्हेट दवाखान्यात भर्ती कर. दुबे डॉक्टर म्हणत होता महिनाभर दवाखान्यात राहिला तर बरं होशील म्हणून."
"एव्हढा खर्च नाही भागवू शकत. मी पगाराच्या पैश्यातून व्याज भरतोय. आता शक्य नाही हा खर्च." बापाला माहित असूनही मी म्हटलं.
"बापासाठी नाही तर कुणासाठी करशील खर्च?"
"बाबा समजून घ्या. व्याजाचे पैसे फेडता-फेडता माझे केस पांढरे होतील."
"तर काय माझ्यासाठी घेतले होते पैसे? तुझ्या बायकोच्या ऑपरेशनला कुठून आणले होते पैसे? तिच्या बापानं दिले होते?"
"मला का मध्ये ओढतात?" कल्पना बोलली.
"तूच कान भरले असतील,ह्या हरामखोराचे. कधी तोंड वर करून बोललं नाही. अन आता बघ कसा कुत्र्यासारखा भूकतो ते."
"असं उलटं-सुलटकाठी पर्यंत बोलणार? पोरगी मोठी झाली आता आमची." कल्पनाचा हा बापाबारोबारचा सामोरासामोरचा हा पहिलाच संवाद होता. मी गोंधळलो. आमची पाच वर्षाची सौम्या आता समजदार झाली होती. घरातील ह्या अशा वातावरणानं तिचं बालपण काहीसं हरवायला लागलं होतं, घराच्या कच्च्या भिंती सारखं
"तू शिकवणार कसं बोलायचं ते ....?" बाप ऑफिसातल्या शर्मात कधी बदलला हे कळलं सुद्धा नाही. बाप ज्यानं आयुष्यभर कधी काम केलं नाही. आईच्या कमाईवर ऐशोआराम करत राहिला अशा बापाचं असणं-नसणं सारखंच होतं. अशा बापाकडून आम्हा भावा बहिणींना अन आईला कुठलीच अपेक्षा नव्हती. असा बाप जो आमच्या पासून आमचं जगणंच हिसकून घेऊ पाहत होता. लहानपणाच्या अस्पष्ट बेरंग आठवणी बोलण्यातून पुढे सरकत होत्या,घृणित स्वरुपात.
आई चपराशी होती. तिच्या नोकरीवर घर चालायचं. बापाच्या दारू-बिड्यांचा खर्च पगारातूनच व्हायचा. सरकारी नोकरी असली तरी आमचं घर मजुराच्या घरापेक्षाही बदहालत होतं मुलींना शिकवायला बापाचा नेहमीच विरोध असायचा. लिहणं- वाचनं त्याला पैश्याची बरबादी वाटायची, तर आईला वाटायचं की मुली थोड्याश्या शिकल्या तर आपल्या पायावर उभ्या तरी राहतील. बापासारखा रिकाम टेकडा नवरा जर पोरींना मिळाला तर उभं आयुष्य बरबाद होणार. तीन मुली अन एका मुलाच्या शिक्षणाचा भर वाहत आई केंव्हा अंथरुणाला खिळली ते कळलं सुद्धा नाही. आईच्या आजारपणात ही आमचं शिक्षण सुरूच होतं. आईचा आजार नंतर समजला, सर्व प्रकारच्या उपचारा नंतर टी.बी. असल्याचं. तेंव्हा आईचं मरण आईच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. आईन एम ए च्या पहिल्या वर्षाला शिकणारी मोठी बहिण सुधा हिचं लग्न लवकरच उरकून टाकलं. तिचा नवरा बारावीसुद्धा पास नव्हता. सुधानेच प्रश्न केलं, "तर मग मला एवढं शिकवलं तरी का?"
"लग्नासाठी नाही शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून शिकवलं. स्वतःच्या पायावर......किती शिकशील .....अन मग काय करशील? आत्ता पर्यंत तर एवढं शहाणपण यायला पाहिजे होतं की, पुढे काय ....?" आईच्या रागाचं उत्तर देऊ शकली नाही सुधा. पुढच्या वर्षी तर बी एस्सी च्या फायनला असणाऱ्या कमलाचं लग्न उरकून टाकलं. दोन वर्षा नंतर सेकंड ईयरच्या दरम्यान ममताचं लग्न केलं. तिघांचेही पती बेकार होते. जशी काही उद्याच मरणार होती, हाच विचार केला तिनं आणि झटपट लावून दिलीत लग्नं चांगल्या घरांच्या चक्रात .
कर्जाचं सगळं ओझं माझ्या शिरावर ठेऊन मरण पावली आई. तेंव्हा मी बारावीची परीक्षा दिलेली. अन पुष्कळशी स्वप्नही रंगवलेली. काय काय बनण्याचे आणि करण्याचे इरादे मनाशी पक्के केलेले? सगळी स्वप्नं आईच्या चीतेबरोबर जाळून खाक झालीत. कॉलेजचं तोंड ही पाहू शकलो नाही नंतर, एवढं बरं झालं की काम्पुटरचा डिप्लोमा बारावीला शिकता शिकताच पूर्ण केलेला होता. पण ह्या डिप्लोमा मुळे नोकरी मिळायला मदत थोडीच झाली. आई मेल्यानंतर अनुकंपा तत्वावर नियुक्ती होण्यासाठी अगोदर एक वर्ष तर सज्ञान व्हयला लागलं. आणि जेंव्हा सज्ञान झालो तर माझ्या क्याटेगरीत जागाच खाली नव्हती. राखीव जागांसाठी 'विशेष भर्ती मोहिमे' अंतर्गत जाहिरात निघाली होती, पण पुढची कार्यवाहिच होत नव्हती. जाहीर झालेल्या पदाला रिक्त समजलं जात नव्हतं. कलेक्टर ऑफिसनं कमिशनरला लिहिलं तिथून सगळ्या विभागात माझा अर्ज रिक्त पदाच्या शोधात फिरत राहिला. पद रिक्त आहे की नाही ह्यातच एक वर्ष वाया गेलं. ना घरका ना घाट का अशी स्थिती होती माझी. केवळ फिरत राहिलो इकडून तिकडे. तेंव्हा भोपाळला लिहिलं की चार-पाच जागी मी केवळ फिरतो आहे. परेशान झालोय. उपाशी राहण्याची पाळी आली आहे. कर्जदार माझा जीव घेतील किंवा मी तरी जीव देईल. माहित नाही माझा अर्ज वाचला की नाही पण फाईली हलल्या अन शाजापुरला पद रिक्त असल्याचं सांगण्यात आलं. तिथं ही एक वर्ष चक्कर काटण्यातंच गेलं .
आईच्या जाण्यान चेहऱ्याच तेज, आवाजातला दमदारपणा आणि गाणं म्हणन्याच स्वरूप बदललं. स्वप्नं तर चितेवरच जळून गेलेली. राख झालेली आणि जे शिल्लक होतं त्यात असं काहीही नव्हतं जे शाबूत राहावं. जी मिळाली ती नोकरी अनुकंपा तत्वावरील नेमणूक. झाडू मारणे, पाणी देणे, साफ सफाईच काम वारसा हक्कानं मिळालेलं.
आमच्या घरी दिवाळी नसते. आम्ही साजरीही करत नाही दिवाळी. नाही लावत दिवे. दिवे लावण्यावरून बापाबरोबर आम्ही प्रत्येक वर्षी भांडायचो. आता एक दिवा लावतो बाप. दिवे लावणं आम्हाला अनावश्यक खर्चाबरोबर निरर्थक ही वाटतं. अन दिवाळीची पूजा तर कितीही भांडलो तरी होत नाही. दिवाळीची पूजा कधीच केली नाही आईनं. आई-बापातल भांडण सण साजरा करायचा की नाही यावरून व्हायचं. आई सणांना महत्व देत नव्हती. आईच्या बोलण्याचा प्रभाव माझ्यावरही पडला. मोठी बहिण आणि बाप एका बाजूला तर बाकीचे चार आम्ही दुसऱ्या बाजूला. जीत आमचीच व्हायची. सुमे दहा वर्षापूर्वी ह्याचं गोष्टी वरून भांडण झालेलं घरात. आई म्हण्यची, "मूर्ती पूजा करून अन दिवे लावून नं सुख मिळतं नं समृद्धी येते. जर लोकं म्हणतात की प्रत्येक माणसात देव आहे, तो सर्व ठिकाणी आहे, तर मग पूजा का करावी दगडांची अन फोटोंची?'
"तुला तर अकलेचा पत्ताच नाही. अक्कल असती तर चांगलं पक्कं घर असतं. पैसे असते" बाप विचार करत नव्हता. विचार करूही इच्छित नव्हता.
"गल्लीत पहा.किती लोकं दरवर्षी पूजाअर्चा करतात, त्यांचं घरी पहा खाण्या-पिण्याची मारामारी कपड्या-लत्त्याच तर सोडूनच द्या. का नाही श्रीमंत होत हे गल्लीतले लोक उपास तापास करूनही?"
" तुला काय समजणार?त्यासाठी अक्कल लागते जी नाही तुझ्याकडे...... ही श्रद्धा आहे श्रद्धा."
"रिकाम टेकड्या लोकांचं म्हणणं असतं श्रद्धा,श्रद्धा ...श्रद्धा?" पुनः पुनः उच्चारत आईन व्यंगात्मक पद्धतीने शब्दांची फोड करत चिरफाड करायची आई.
बाप शेवटचं वाक्य बोलला, "मूर्खांच्या तोंडी लागता येत नाही."
ह्या प्रश्नोत्तरात आईचं म्हणणं नेहमी सरळ डोक्यात शिरायचं बापाचा तिटकारा यायला जी अनेक कारणं होती त्यात हेही एक होतं की,ते आईला नेहमीच दुय्यम, बेअक्कल, मूर्ख, आणि गाढव म्हणायचे, समजायचे. आई बापाचं ओझं वाहतच राहिली.
ह्या वेळी बाप काही म्हणेल ह्या अगोदरच दिव्यांची खरेदी केली होती. बाजारात जाहिराती, मोठ-मोठ्या पोस्टरवर होत्या. दुकाने सजवलेली होती. खिश्यांचा शोध घेणाऱ्या दुकानदाराच्या नजरा, अभावग्रस्ततेची जाणीव करून देत उपकार म्हणून व्याजाने सामान वस्तु देण्यासाठी दुकानदार उभे दिसतात. वेष बदलून लांडगे शिकार करू इच्छित होते. मी ह्या पासून दूर. मान खाली घालून पुढे जायचं म्हणून गेलो आणि एका लहान तलावातील घाणीचा भपकारा आला म्हणून मी मान वर केली. घाणीत मान आणि नजर वर जाते माझी. लहान तलाव माझीच वाट पाहत असतो की मी येईल आणि तो घाण वास पसरवणार. लहान तलावात सगळ्या घरातली घाण जमा होते. लोक आपापल्या घरात हगणार-मुतणार आणि सरळ पाईपातून घाण तलावात सोडणार.बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलं आणि पक्क्या घरांच्या पिलरवरउभे केलेत आपले आशियाने. असंच एक लहान मंदिर मोठं होत गेलं दर वर्षी. तलावाच्या दिशेने मंदिर सरकल्यामुळे श्रद्धाळूंची गर्दी, गाड्या वाढतात.
बाजार आणि मंदिरातील वाढत्या गर्दीतून स्वतःला वाचवत पुढे जाताना वाटते की, मला हाकलल जातंय. माझी जरुरतच नाही इथं. परकेपण कुठून तरी येऊन मला घेरून टाकत. आणि उदासीची घाण माझ्या शरीरातून वाहताना दिसते. लहान तलावातलं घाण पाणी, शेवाळाची लांब चादर चढवून निर्जीव वाटतं. समाजाने बेदखल केलेल्या छोट्या तळ्या प्रमाणे स्वतःला वाटतं. शर्मा श्रीवास्तव यांच्या घर आणि डोक्यातल्या दुर्गंधीयुक्त घाणीला जागा करून देण्यासाठी माझा वापर होतो. आणि मी ती समावून घेत जातो.
कामात बदल सात वर्षा नंतर झाला होता जेंव्हा खान बुला माहिती झालं की मी काम्पुटर मध्ये डिप्लोमा केलं आहे. ऑफिसात सात वर्षे स्टोअर्स मध्ये पडून असलेल्या काम्पुटरला मी चालू केलं. एक आवडतं काम ज्यानं माझी हरवलेली चमक आणि स्वप्नं जागवण्याच काम केलं.
आकडेवारी एकत्र करण्याचं ते झपाटलेपण आहे की ज्यामुळे मी जिवंत असल्याची मला जाणीव होते. त्याच आकडेवारीच्या सोबतीनं मी माझं आयुष्य जगतो आहे.
जिवंत असल्याची जाणीव तर मला माझी मुलगी सौम्या हिच्या मुळेही होते. पाच वर्षाच्या मुलीला सकाळी साडे सात वाजता शाळेत सोडून आलो तर मी आठवण्याचा प्रयत्न करू लागलो की बापानं कधी शाळेत सोडलं होतं मला? ह्या आठवणीनं जी अढी निर्माण केली ती आपल्या मुलीच्या मनात येऊ नये, म्हणून दररोज तिला शाळेत सोडायला जायचा निश्चय पक्का केला. सुख समाधानाचा लेप सगळ्या अंगावर पसरला. वर्तमान पत्र वाचयची इच्छा झाली पण घरी वर्तमान पत्र येत नाही अन देश दुनियाची खबर घेतल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. ऑफिसात 'नेट ' वरून बातम्या वाचतो. कधी ग्रुप डिस्कशन मध्ये सामील होतो आणि देश दुनियावाली भूक शांत करतो.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्र्यांसमोर बी डी ओ प्रोजेक्टरवर आलेख आणि आकडेवारी मांडत, स्पष्ट करत होते. प्रसन्नतेचे भाव आपापसात येत जात होते. बदलणारी स्लाईड खुशीत भर टाकत होती. तालुक्याच्या वार्षिक योजनांमध्ये विविध कल्याणकारी कार्यक्रमांच लक्ष्य वेग वेगळ्या गावांमध्ये विभागून समन्वयीत विकासाचा विचार मांडला जात होता. बी डी ओ सांगत होते की, तालुक्याला आठ गटात विभागून कौटुंबिक समूहांना योजनांचा लाभ मिळवून देत त्या क्षेत्राला चिरंतन विकासाशी जोडण्यात आलेलं आहे. एका योजनेतून जनावरं दिली जातात तर दुसऱ्या योजनेतून पशु खाद्याच दुकान, तिसऱ्या योजनेतून दुध डेअरी तर चौथी योजना वाहन उपलब्ध करून देत शहराशी जोडणारी आहे. ह्याचप्रकारे फलोत्पादन, भाजीपाल्याच्या जोडीला वाहतूक आणि मार्केट उपलब्ध करून देणारा हा एकात्मिक कार्यक्रम आहे.
"व्हेरी गुड." मंत्री महोदय म्हणाले.
"सर ह्या प्रोग्रामिंगची कल्पना मला तेंव्हाच सुचली जेंव्हा माझ्या टेबलावर एकदम पन्नास फाईली ठेवल्या गेल्या. आता त्यातली माहिती आणि आकडेवारी कशी ट्याली करू? पन्नास फाईली माझ्या टेबलावर खुलू शकत नाहीत तर मग काम्पुटरवर बसलो. आकडेवारी फीड केली आणि प्रोग्रामिंग केलं.....सर मला वाटतं देशाचा विकास लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आल्याशिवाय शक्य नाही. आणि आर्थिक विकासाचा लाभ जर सर्व ठिकाणी पोहचला नाही तर लोकशाहीला काही अर्थच उरणार नाही" बी डी ओ बोलत सुटले, भाषण दिल्यासारखे.
lap top वर माझी बोटं थिजली. किती खोटं बोलतो आहे बी डी ओ; माझ्या समोर? ही माझी आईडिया, माझी मेहनत, माझं काम, माझे शब्द अन वाक्य. जयाल ते आपलं सांगताहेत. वाटलं ओरडून सांगावं की हे बी डी ओ नं केलेलं काम नाही. वाटलं सगळ्यांना सांगावं की ही माझी आईडिया आहे. हे काम आहे माझं, माझे विचार आहेत हे. मी बाबू लोकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या विरोधाचा आवाज शोधतोय. पण ते गप्प आहेत. निर्जीव. ह्या स्मशान शांततेत बसलेल्या मढयानमध्ये नामर्द बी डी ओ एवढा मोठा धोका कसा देऊ शकतो? दुसऱ्याची मेहनत, बुद्धी आणि कामाला कुणी स्वतःच काम म्हणून कसं सांगू शकतो?आरोळी मध्ये जर असती आग तर सारं ऑफिस जाळलं असतं.
"व्हेरी गुड, वेल खूपच छान काम केलंय." मंत्री महोदय फार प्रभावित झाले.
"सर आमच्या कडे काम्पुटर ऑपरेटर नाही. शासनाने काम्पुटर तर पुरवलेत परंतु ऑपरेटर नाहीत. आपणास विनंती आहे की, एक ऑपरेटर जर उपलब्ध झाला तर सगळ्या ऑफिसचं संगणकीकरण करून टाकीण म्हणतो." धूर्त बी डी ओ बोलला. हॉल मध्ये लटकलेले नवीन पंखे गरगरा फिरत होते.काय चाललं ते लक्षात येत नव्हत. मी पंख्यामध्ये कधी परावर्तीत झालो हे माझं मलाच कळलं नाही. पंख्यांना कुणी तरी चालवतय. पंख्यांच चालू असणं त्यांची नियती आहे; माझी नियती सुद्धा चालणं हीच आहे. किती काय काय ऐकलं, सहन केलं आणि शेवटी काय मिळालं? काय मिळणार? ....काहीही नाही ....काहीही नाही..... पंख्यांची गती वाढली. वाढला आतला आवाज. आणखी वाढला. मला राहवलं नाही. आणि मी उठून बाहेर पडलो.
कॅम्पस मध्ये हापशीवर साताठ वर्षाची एक मुलगी पाणी भरण्यासाठी झटतेय. त्या मुलीला पाहून मला माझी सौम्या आठवली. मुलगी एक घागर पाण्यासाठी हापशीच ह्यांडल मारण्याचा जीवानिशी प्रयत्न करते. थंडीने कुडकुडत,घरच्यांची तहान भागवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या त्या मुलीचे केस विस्कटलेले, फ्रॉक फाटलेला. सौम्याला कधी घेतला होता फ्रॉक? नाही आठवत महिना, वर्ष. त्या मुलीच्या पायात नव्हती चप्पल. तिथच चिखलात उभी राहून एक लहानशी घागर सुद्धा भरू न शकलेली. ती कधी घागर कडे तर कधी ह्यांडल कडे बघते. तिची नजर आशेने बघत नाही कुणाकडे. किती सहज शिकली ती मुलगी आशा न बाळगण्याचा धडा. मी अजूनही शिकू शकलो नाही. मी हपाश्या जवळ आलो आणि न बोलताच ह्यांडल मरू लागलो. घागरीत पाणी नाही तर आनंद भरला,जो घेऊन ती हसण्याचा प्रयत्न करत निघून गेली. मला समाधान वाटलं पण चेहरा खुलला नाही माझा. बी डी ओ चा धूर्तपणा होता की मग सौम्याच फणफणणारं शरीर,की ज्यामुळे माझा चेहरा खुलला नसावा. माझ्या डोळ्यात आसवं आली आणि मी सरळ घराकडे निघालो.
सौम्याच्या लहानग्या हातांना मी स्पर्श केला. सौम्याच अंग फणफणलय तापानं. तोंडून निघत नाही माझ्या शब्द. काय विचारू? काय म्हणू.....काहीही कळत नाही. हताश झालेलो. किती हताश झालोय मी. किती कमजोर......सौम्या बरोबरच ऑफिसच्या आठवणीनी डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातले अश्रू थांबत नाही तोच दरवाजा समोर ऑफिसचा प्यून उभं दिसला. "साहेबांनी अर्जंट बोलवलय, जसा असशील तसा ये. नाही तर......" पुढे काहीही बोलला नाही तो. मी सुद्धा विचारलं नाही त्याला आणि आलो ऑफिसात.
ऑफिस मध्ये गोंधळ माजलेला आहे. बी डी ओ मोठयाने रागावतो आहे. सस्पेंड करण्याचं पत्र टाईपरायटरवर टाईप करतोय जोशी. कुठलंही कारण न सांगता गैरहजर राहण्याचा ठपका ठेऊन सस्पेंड करण्याच्या फर्मानावर शब्दांच्या तोफा डागल्या जाताहेत.
मी बी डी ओ च्या समोर पोहचत नाही तोच बी डी ओ न माझी हजेरी घ्यायला सुरवात केली.
"मोठा नालायक आहेस. एवढा हरामखोरपणा,एवढा अहंकार, lap top सोडून निघून गेला तू ......?"
"सर ते ......."
"वाद घालतोस हरामखोर"
"मी आज "
"तोंडाला तोंड देतोस? काय समजतोस काय स्वतःला?.......तुझ्या शिवाय आम्ही काय काम करू शकणार नाही? तू लागून तरी कोण गेलास एवढा?"
जैविक हत्यारं ह्याच शब्दांना म्हटलं जात असावं. संपूर्णपणे मन- मस्तिष्कापर्यंत. सगळ्या शिरांना नेस्तनाबूत करत. शब्दांनी छाटलं मला. शब्दांचा विषारी gas माझ्या शरीराच्या आत बाहेर ......gas जो हसवत होता. इतरांना. माझा जीव गुदमरायला लागला. ह्यालाच म्हणतात मरण?
मरण.
ऑफिसात पाऊल टाकताच गळ्यातून आवाज फुटतो आणि मी गायला लागतो. मोठं विचित्र वाटत, जेंव्हा विचार करतो मी. ही गाणी केंव्हा प्ले होतात; केंव्हा सिलेक्ट करतो मी त्यांना?केंव्हा व्हाल्युम वाढतो त्यांचा इको साउन्ड मध्ये. घरात, रस्त्यावर, कधी लक्षात ही येत नाही. ऑफिसात सकाळ असो किंवा रात्री घरी परतल्या नंतर......आवाज गाण्यात बदलतो. गळ्याची नस खुलते "मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र कॉ धुये में उडाता चला गया ......" गात गातच उघडली ऑफिसची खोली.
दुपारी १२ ते ४ लाईट नसते. सकाळ आणि रात्रीचा उपयोग होतो काम्पुटरसाठी. इनव्हरटर ची मागणी केली पान मोठ्या साहेबांच्या ऑफिस शिवाय त्याचा काही उपयोग होत नाही. मी दिवसा डाटा कलेक्शन करतो. बाबू लोकांशी डोकं लावतो. आज दोन मोठ्या फाईली मिळाल्या. प्रत्येक कागद महत्वपूर्ण वाटला, दोन महिण्याचा पगार एक्स्ट्रा मिळाल्या सारखा . लाईट येण्याची वाट पाहत तसाच काम्पुटर जवळ बसून राहिलो फाईलीची पान उलटवत आणि खुश होत राहिलो. लाईट आली तेंव्हा सर्वात अगोदर 'मिडिया प्लेअर' क्लिक करून किशोर कुमारची गाणी सुरु केली. गाणी काम्पुटर मधून नव्हे तर माझ्यातूनच वाजू लागली. मी गाऊ लागलो, डोलू लागलो, तोच बी डी ओ साहेब खोलीत शिरले. आत शिरताच रागात ओरडले, "हे ऑफिस आहे की सिनेमा थिएटर? गाणी बिनी काय-काय चाललं आहे? नाच गाणं सुद्धा होत असेल....काय.......काय काय चालत इकडे?"
"नाही सर तसं काही नाही" अपराधीपणानं बोललो मी.
"मग कसं आहे? मला सांगतोस? मला? क्रोधीत झाले बी डी ओ
"मी.....फक्त ......"
दोन मिनिट सुद्धा लागणार नाहीत ती सस्पेंड ऑर्डर साईन करायला . मग ऐकत राहा, नाचत राहा.......चार दोन कामं काय केलीत, माहित नाही स्वतःला काय समजायला लागला.
माझा गळा भरून आला. वाटलं डोक्यात एखाद्या हापश्याचं ह्यांडल मारता मारता थांबलं, त्यामुळे नाही येऊ शकली डोळ्यातून आसव. डोळे वटारले बी डी ओ ने तरीही माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही तेंव्हा निघून गेले बी डी ओ.
ऑफिस बद्दलही चीड वाटायला लागली आता. फाईली शोधतो. आपल्या टेबला जवळच्या कोपऱ्यातील खिडकीतून थुंकायला आणि नाक शिंकरायला बाबू लोक जराही हीचकीचत नाहीत. शर्मा बाबूला आपलं नाक शिंकरल्या नंतर सर्दी मुळे तयार झालेला बेडका काढताना पाहिलं टर राहवलं नाही मला.
"जिथं बसतात तिथच थुंकण आणि नाक शिंकरण?"
"आम्हाला वाटलं तर इथच खिडकीत हागणार मुतणार. तुला काय त्रास?" कडकड्णाऱ्या आवाजात डोळे वटारत बोलला शर्मा.
"मला तसं नाही म्हणायचं."
"तर आम्हाला शिकवणार कसं म्हणायचं ते? एवढं तर आम्हालाही कळत. मला नको शिकऊ. ......आपलं आपलं काम कर...."असं बोलल्यानंतर शर्माजीना जसं काही तरी आठवलं अन ते पुनः बोलले, "चाल आपलं काम कर, झाडू मार झाडू. चार बुक शिकला म्हणून आपली औकात विसरू नको. काम्पुटर वर बसतो तर काय आमची बरोबरी करणार ? ........ विसरू नको आपली ......."
इच्छा नसताना शर्मानं शब्द दाबला. रोखला. आणि गिळला. परंतु त्याचा अर्थ बाहेर पडला आणि पसरला माझ्या मेंदूत, नसा-नसात अर्थ भिनला.
"काय विसरलोय मी......?"माहित नाही कसा राग आला प्रतिकार म्हणून शर्मा काहीही बोलला नाही.
मी रात्रदिवसा काम करतो. पाणी पाजतो. सगळ्या पात्रांची आणि पाक्षिक मासिक माहिती टाईप करून देतो. प्रोग्रामिंग केलं तेही चोरलं बी डी ओ नं, आणि बाबू लोकांनी सुख. काय हवय ह्या लोकांना माझ्या कडून? त्या दिवशी ही जोशीला म्हटलं होतं हे दोन ओळीच पत्र आपल्या हातानेच लिहा तर जोशी म्हणाला होता, "जास्त नखरे करू नको . टाईप कर मुकाट्यानं." तर मी म्हटलं होतं,'ही काही टाइपिंग मशीन नाही काम्पुटर आहे.' तर जोशी बाबू म्हणाला,'आम्हालाही माहिती आहे. तू सांग काय काम असतं काम्पुटरच ते?' होतं उत्तर पान नाही बोललो काही. परंतु आता तर कहरच झाला. एवढं सारं झाल्या नंतर शर्मा म्हणतो , विसरू नको ......विसरू नको ....... विसरू..... नको ......आपली ......नको ......विसरू ........
डोकं गरगरायला लागलं तर मी चहाच्या टपरीवर आलो. वातावरणात अचानक बदल झाला. थंड वाऱ्याबरोबर गारांचा पाऊस पडायला लागला. "चला बरं झालं अवकाळी पावसानं पिकांना फायदाच होईल." दयालु बोलला. काहीही बोलू शकलो नाही मी. तर पुनः दयालु बोलला, "तुझा चेहरा का पडला? गारांचा पाऊस तुझ्या मनातही पडतोय वाटतं?" तरीही मी काहीच बोललो नाही. वर्तमान पात्राच दुसरं पान वचता-वाचता दयालु बोलला, "बुश नं इराक वरच्या हल्ल्यात एन्थ्रेक्स, gas आणि रासायनिक हत्यारांचा वापर केलं. मस्टर्ड gas युक्त तोफा आणि रासायनिक हत्यारांनी इराकवर बॉम्ब वर्षाव केला. सद्दाम पासून सुटका करून घेण्यासाठी बुश यांनी लाखोंना कंठस्नान घातलं. आणि हजारोंना तुरुंगात डांबल. त्यांना विवश करण्यात आलं की, अगोदर त्यांनी आपलं जेवण स्वछतागृहात टाकावं आणि त्या नंतर तिथून उचलून ते त्यांनी खावं. कितीतरी लोकांना विवस्र करून त्यांच्या पार्श्वभागात काठ्या टोचल्या. कितीतरी....."
मी वर्तमान पत्र वाचायला लागलो. वाचकांची पत्रे ह्या सदरात कोपऱ्यात लहानसं पत्र, नागपूर जवळ खैरलांजी मध्ये चार दलितांची हत्या वाचू लागलो. प्रियंका नावाच्या मुलीला विवस्र करून गावातून तिची धिंड काढली. गावातील हुशार मुलगी. शिक्षणात अव्वल राहिलेली. सायकलीवरून शाळेत जायची. तिचं हुशार असणं, सायकलवरून फिरणं, तिचं दलित असणं, सहन नाही झालं लोकांना. प्रियांकाला आपली पायरी दाखवणे, धडा शिकवण्यासाठी विवस्र केलं. बलात्कार केला खुलेआम, तरीही अमानुषपणाची हद्द संपली नाही. त्या नंतर आई-मुलगी आणि दोघं भावांची हत्या करण्यात आली.
हिंदी वर्तमान पत्रातून गायब होती बातमी. ह्या अगोदर नाही वाचू शकलो होतो मी. टपरीवर चहा पिता-पिता म्हटलं मी, "खैरलांजीची घटना किती अमानुष आहे?"
"काय झालं?" महिला बाल-विकास विभागातील बाबू गब्बुलाल बोलला.
"चार दलितांची हत्या.......सर्वात भयंकर बाब म्हणजे आई व मुलीची विवस्र करून गावातून धिंड काढल्या नंतर जमवा समोर बलात्कार केला. आणि त्या नराधमांचा कलेजा तरीही शांत झालं नाही तर त्यांची हत्या करण्यात आली......हत्या?"
"तू एवढा भावनिक का होतोस?"
"गुन्हा काय होता प्रियांकाचा? तिचं शरीर, तिचं डोकं, तिची हिम्मत, तिचं सैन्यात भर्ती होण्याचं स्वप्न........बरोबरी करण्याचा इरादा...........१७ वर्षाच्या मुलीचा काय होता गुन्हा?"
"तुझा गुन्हा काय आहे? जे तुला दर रोज अपमानित करण्यात येतं, काय अपराध केलाय तू ? तू सुद्धा हुशार आहेस. .....प्रत्येक वेळी कामात गढून गेलेला असतोस. घरादाराची पर्वा न करता काम करणं.......?काय हा तुझा गुन्हा आहे?"
चहा गार झाला. डोकं गरम झालं. आशा प्रकारे विचारच केला नव्हता कधी. नाही पिऊ शकलो मी चहा.
"कसला विचार करतोस?" दयालुने प्रश्न केला.
"धडा शिकवायची ही एक पद्धत आहे. धडा.......जो नाही मानणार म्हणणं, त्यच्या बरोबर असाच व्यवहार होणार." गब्बू लालचा चहा संपला बोलता बोलता.
" होय धडा........बुशन काय काय नाही केलं, केवळ धडा शिकवण्यासाठी. बुश म्हणायचा आम्ही स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी काम करतोय.........." गब्बूलालच म्हणणं पूर्ण व्हायच्या आत दयालु म्हणाला,"आम्ही सुद्धा म्हणतोय नं वसुधैव कुटुंबकम............आम्ही सुद्धा म्हणतो स्त्री असते देवी. आम्ही पूजा करतो स्त्रीची.....आम्ही सुद्धा करतो प्रियांकाला विवस्त्र.... आम्हीही करतो दलितांच्या हत्त्या....... मनुचे वारसदार धडा शिकवतात. तिकडे बुश इकडे मनु." म्हणत म्हणत दयालून वर्तमान पत्र फाडलं. आणि स्टोव्ह पेटवायला त्यानं त्याला आग लावली. स्टोव्हच्या तोंडातून निघालेल्या रॉकेलमुळे भडका उडाला. धूर आणि आगीने भरलेला, ज्यावर सतत आदळत राहिलं प्रियांकाच प्रेत, प्रियांकाची स्वप्नं, प्रियांकाची बुद्धिमत्ता,..........प्रियांकाच्या आई-भावाची प्रेतं, लगातार फिरताहेय शर्मा बाबू....श्रीवास्तव बाबू ......जोशी बाबू ......नको विसरू .....नको विसरू ......नाही विसरू शकत जॉर्ज बुश .......लाखो मृत्यू....मनु.....चार......प्रेतं. हजारो कैदी......त्याच मेलेल्या, बंदी झालेल्या लोकांत स्वतःला पाहतोय मी.
***************
मूळ हिंदी शीर्षक ---- कितने बुश कितने मनु
लेखक कैलाश वानखेडे
मराठी अनुवाद ----- अरविंद सुरवाडे
ब्लॉक ए १८० /३६०
करुणा को ऑप. हौसिग सोसायटी
उल्हासनगर जिल्हा ठाणे

2 comments:

Voice of youths said...

भाई साहब इसका हिंदी अनुवाद कहाँ मिलेगा? ये अपनी समझ से बाहर है|

kailash said...

blog me hi milega.ab blog me suvidha ke liye parivartan kiye hai .ab aapko shikayat nahi milegi.